आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पैठण येथील खुल्या कारागृहात मेहुणीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुंबईचा हर्षल सुरेश रावते (४४) या कैद्याने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून नव्या इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात उडी मारून आत्महत्या केली. हर्षल १० जानेवारीपासून पॅरोलवर होता. गुरुवारी त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी खून प्रकरणात झालेल्या शिक्षेमुळे दुरावलेले नातेवाईक आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. या संदर्भात तपशील असलेली एक सुसाइड नोट त्याच्या खिशात सापडली आहे.
मंत्रालय इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात एक तरुण पडला असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचे स्पष्ट झाले. त्याला गंभीर अवस्थेत कर्मचारी व पोलिसांनी तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या खिशात सापडलेले ओळखपत्र व इतर कागदपत्रांवरून त्याचे नाव हर्षल सुरेश रावते असल्याचे स्पष्ट झाले. तो चेंबुरमधील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे चेंबुरमध्ये मसाल्याचे दुकान आहे.
गुरुवार होता पॅरोलचा शेवटचा दिवस
मेहुणीच्या हत्येप्रकरणी हर्षलवर ठाणे पोलिसांत गुन्हा नोंद होता. त्यात त्याला जन्मठेप झाली. २०१४ पासून हर्षल पैठणच्या खुल्या कारागृहात होता. पैठण येथील कारागृह अधिक्षक सचिन साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल या खुल्या कारागृहात कैद्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत होता.
दरम्यान, १० जानेवारीपासून तो एक महिन्याच्या पॅरोलवर (रजा) गावी गेला होता. गुरुवारी त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता, अशी माहिती राज्याच्या तुरुंग विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.
आत्महत्या की घातपात?
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅरा लीगल विभागाचा हर्षल स्वयंसेवक असावा. तसे ओळखपत्र त्याच्या खिशात आढळले आहे. हर्षल याची आत्महत्या आहे की घातपात, याची चौकशी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
खिशात सुसाइड नोट
हर्षल याच्या खिशात सुसाइड नोट सापडली. त्यात त्याने आपण मेहुणीचा खून केल्याचे नमूद करून या गुन्ह्यात झालेली शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्न करत आहोत, असे नमूद केले आहे.
नोकरीच्या आमिषाने मेहुणीला फसवले... नंतर मारले
हर्षल पत्नी सरितासोबत चेंबूरमध्ये राहत होता. बँकेतील अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगून मेहुणी सुवर्णा कदम हिला नोकरी लावून देतो म्हणून त्याने ८५,००० रुपये घेतले. बनावट नियुक्तिपत्र करून कुरियरने मेहुणीला पाठवले. ते खोटे असल्याचे उघडकीस आले. सुवर्णा आता आपली बदनामी करेल, या भीतीने त्याने सुवर्णावर चाकूने ४४ वार करत तिची हत्या केली.
> या प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात त्याला भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप, कलम ३८० अन्वये ५ वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा झाली आणि त्याची पैठण कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहात शिक्षा भोगत असतानासुद्धा त्याला एक वेळ शिक्षा झाली आहे.
मंत्रालयात जाताना गृह विभागात काम असल्याची नोंद
गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी हर्षल याने मंत्रालयात प्रवेश केला. मंत्रालयात प्रवेशावेळी नोंद व ओळखपत्र काढताना त्याने गृह विभागात आपले काम असल्याचे नमूद केले होते. गृह विभागात त्याने अधिकाऱ्याशी भेटण्याचा प्रयत्न केला होता. जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता. नंतर ६ वाजून १० मिनिटांनी त्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.
नातेवाईक दुरावले...
अटक झाल्यापासून हर्षलपासून नातेवाईक दुरावले होते. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. मंत्रालयात आला तेव्हा तो मद्यप्राशन करून आला होता का, याचा तपासही पोलिस करत आहेत.
गृह विभागाकडे प्रकरण
हर्षलने आतापर्यंत १२ वर्षे ६ महिने शिक्षा भोगली आहे.
तुरुंगात असताना आतापर्यंत त्याने ६ वेळा संचित आणि २ वेळा अभिवचन रजा उपभोगल्या.
शासन निर्णयाप्रमाणे खुनाच्या गुन्ह्यात क्रूरता अधिक, गुन्हा महिला वा बालकांविरुद्ध असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत २६ वर्षांनंतर माफी देता येते.
त्यामुळे या प्रकरणात त्याला इतक्यात कायद्याने माफी देता येणे शक्य नव्हते, असे गृह विभागाने सांगितले.
विखे पाटील यांची सरकारवर टीका
मंत्रालय आता सुसाईड पाँइंट झाला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. नागरिकांना मंत्रालयात येऊन जीव देण्याची वेळ का येते, याचे सरकारने आत्मपरिक्षण केले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्टिट केले.
१७ दिवसांत चार प्रकार, दोघांचा मृत्यू
मंत्रालयात गेल्या १७ दिवसांत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चार प्रकार घडले. यातील दोघांचा मृत्यू झाला. २३ जानेवारीला जमिनीच्या मोबादल्यासाठी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने विष घेतले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २ फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील मारोती धावरे या तरुण शेतकऱ्याने विषाची बाटली घेऊन मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला अडवण्यात आले. ७ फेब्रुवारीला अहमदनगरच्या अविनाश शेटे या युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी हर्षल रावतेने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.