आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कमांडरसह 16 नक्षलींना भामरागड जंगलात कंठस्नान; पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड तालुक्यात ताडगावजवळील बोरिया जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण चकमकीत १६ नक्षलवाद्यांना पाेलिसांनी यमसदनी पाठवले. यात दोन जिल्हास्तरीय नक्षल कमांडर्सचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जाण्याची चार दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकातील जवानांनी ही कारवाई केली. 
गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नक्षलविराेधी ‘सी-६०’ पथकाचे जवान भामरागड तालुक्याच्या सीमा भागातील ताडगाव परिसरात अभियानावर होते. सकाळी सातच्या सुमारास बोरिया जंगलात या पथकाचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू झाला. ही चकमक सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुरू होती. गोळीबार थांबल्यानंतर सी-६० पथकाने परिसराची पाहणी केली तेव्हा १६ मृतदेह सापडले.

 
महासंचालकांकडून अभिनंदन : या कारवाईनंतर सी-६० पथकाने कोंबिंग अॉपरेशन सुरू केले आहे. या कारवाईची माहिती मिळताच पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी गडचिरोली पोलिस आणि सी-६० पथकाचे अभिनंदन केले.

 

साईनाथ, सिनूचा खात्मा-


या कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांत विभागीय समितीचा सदस्य असलेला कमांडर साईनाथ आणि सिनू या कुख्यात नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


सी-६० दलातील जवान  सुरक्षित-


नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी या कारवाईला दुजोरा दिला. चकमक थांबल्यानंतर महानिरीक्षक शेलार दुपारीच गडचिरोलीकडे रवाना झाले. या चकमकीत सी-६० दलातील जवान सुरक्षित असल्याची माहिती शेलार यांनी दिली. 

 

होळीच्या दिवशी ६ महिला कमांडरसह १० जण मारले-

 
यापूर्वी होळीच्या दिवशी तेलंगणा पोलिसांनी छत्तीगडच्या सीमेवर केलेल्या कारवाईत ६ महिला कमांडरसह १०  कुख्यात नक्षलवादी मारले गेले होते. या कारवाईत एक जवानही शहीद झाला होता.

 

पावसात अडकले पथक-

 

 दुपारपासूनच भामरागड तालुक्यात पाऊस असल्याने नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे पोलिस पथक रात्री दहा वाजेपर्यंत गडचिरोली मुख्यालयात परतले नव्हते. शनिवारी सायंकाळी निघालेल्या या पथकाने रात्रभर पायपीट करून भामरागड गाठल्याचे शेलार यांनी सांगितले.

 

पुढील स्लाईडवर पहा, आणखी माहिती ..... 

बातम्या आणखी आहेत...