आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरात गेलेले महाराष्ट्राचे 5 आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून बालबाल बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/मुंबई-  जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांच्या हल्ल्यातून महाराष्ट्रातील ५ आमदार सुखरूप बचावले. पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, पाचोऱ्याचे (जळगाव) शिवसेना आमदार किशोर पाटील, फलटणचे (सातारा) राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण, मानखुर्दचे (मुंबई) शिवसेना आमदार तुकाराम काते आणि उमरेडचे (नागपूर) भाजप आमदार सुधीर पारवे येथे आले होते.

 

ते बुधवारी अनंतनाग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीजबिहार गावाजवळील गोरीवान चौकात प्रवासादरम्यान त्यांच्या आधीच्या सुरक्षापथकाच्या वाहनावर दुपारी अतिरेक्यांनी ग्रेनेड्सने हल्ला केला. मात्र, ग्रेनेड वाहनावर फुटण्याऐवजी रस्त्यावर फुटले. यात एका महिलेसह १० जण जखमी झाले. 

 

पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी मी, सुधीर पारवे, दीपक चव्हाण, तुकाराम काथे व सुधीर पाटील हे ५ आमदार व अधिकारी वर्ग असे २१ जण १९ मे रोजी ७ दिवसांच्या दौऱ्यावर काश्मीरकडे रवाना झालो. बुधवारी आम्ही अनंतनाग जिल्ह्यात होतो. आम्हाला पोलिसांच्या २ गाड्या संरक्षणासाठी दिल्या होत्या. एक मोटार पुढे व एक मागे होती. बुधवारी बीजबिहार तालुक्यात दौरा होता. हे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री स्व. मुफ्ती महंमद सईद यांचे गाव. गावात गर्दीच्या ठिकाणी अचानक टायर फुटल्यासारखा आवाज आला.

 

एखाद्या गाडीचे टायर फुटलं असावं, असं आम्हाला वाटलं. नंतर बाजारातील लोक सैरावैरा धावताना दिसले अन् आम्ही घाबरलो. गावात स्फोट झाला होता. एकाच पळापळ उडाली. तरीही आमच्या मोटारी थांबवल्या नाही. शहरापासून बरंच दूर आल्यानंतर मोटारी थांबल्या. आमच्या वाहनाचे दोन्हीही टायर फुटले होते. एका गाडीला छर्रे लागून छिद्रेही पडली. छर्रे जर कुणाला लागली असती तर... . जवान म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही सुरक्षित आहात. येथे हे आम्हाला रोजचंच आहे...तेथून आमचा ताफा थेट श्रीनगर येथे जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष रवींद्र गुप्ता यांच्याकडे गेला.

 

त्यांना आम्ही घडलेली घटना सांगितली. ते म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही आलात म्हणून ही घटना घडलेली नाही. येथे असे प्रकार नेहमीच होत असतात. त्यामुळे तुम्हाला आम्ही आणखी संरक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितलं. आता उद्या आमची बैठक आहे. ही घटना घडली असली तरी आम्ही आमच्या दौऱ्यात कोणताही बदल केलेला नाही. सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छांमुळे आम्ही सुखरूप आहोत. परतल्यानंतर भेटू.

 

जवळच हल्ला झाल्याने ग्रेनेडचे तुकडे आमच्या ताफ्यातील गाड्यांवरही आले : आमदार सुधीर पारवे दुपारी अनंतनाग येथून जाताना जवळच असलेल्या बीजबिहार गावात मुस्लिम बांधव रोजानिमित्त जमा झाले होते. तेथे चांगलीच गर्दी होती. मुस्लिम बांधवांवर अतिरेक्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. हा हल्ला आमच्या रस्त्याच्या जवळच झाला असल्याने ग्रेनेडचे काही तुकडे आमच्या गाड्यांच्या ताफ्यावरही आले. पुढील गाडीचा टायर फुटला आणि काही तुकडे गाड्यांवर उडाले. मात्र आम्ही सर्व सुखरूप आहोत.

 

गाडीतील सुरक्षा रक्षकांनी आम्हाला बीजबेहारा गावात हल्ला झाल्याची आणि त्यात ४-५ मुस्लिम बांधव जखमी झाल्याची माहिती दिली. या घटनेनंतर आम्ही काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना भेटलो. आमची चर्चा झाली. आम्हाला सुरक्षा दिलेलीच होती ती आणखीन वाढवली. 
 

बातम्या आणखी आहेत...