आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 6 कोटींचे स्मशान; मुंबईमध्‍ये तीन स्मशानभूमींची उभारणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे यासाठी मुंबई पालिका लवकरच खास प्राण्यांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्चून तीन स्मशानभूमी उभारणार आहे. प्राण्यांसाठीच्या या स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने ‘सीएनजी’ इंधनावर आधारित असणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये १ लाख २५ हजार कुत्री असून मांजरांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 

 
राजधानीमध्ये परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार स्थळ अाहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते. महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची कार्यवाही बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजरींची संख्याही मोठी आहे. या पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात.


  महालक्ष्मी (शहरासाठी), देवनार (पूर्व उपनगरासाठी) व मालाड (पश्चिम उपनगरासाठी) येथे या पर्यावरणपूरक स्मशानभूमी उभ्या करण्यात येतील.  तसेच त्या ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तसेच स्मशानभूमीच्या परिरक्षणासाठी व इंधनासाठी होणारा खर्च महापालिकेद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.  

 

मुंबई महापालिकेत ३३ हजार पाळीव कुत्रे  
वर्ष २०१२ च्या प्राणी गणनेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात पाळीव ३३ हजार ५७२ कुत्रे आहेत. तसेच सन २०१४ मध्ये महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार मनपा क्षेत्रात ९५ हजार १७२ भटके कुत्रे आहेत. यापैकी ६९ हजार २३९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. सध्या महापालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने असून परळ परिसरात एक रुग्णालयही आहे, अशी माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...