आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plane Crash: मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत विमान काेसळले; ५ ठार, शेकडो बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील घाटकोपरमध्ये अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत गुरुवारी दुपारी १२ सीटर चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा  मृत्यू झाला. यात विमानातील २ पायलट, २ तंत्रज्ञ व एका पादचाऱ्याचा समावेश आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर विमान काेसळले. तिथे काेणीही राहत नसल्याने माेठी प्राणहानी टळली. जुहू विमानतळावरून युवाय एव्हिएशन प्रा. लि.कंपनीच्या किंग एअर-९० विमानाने चाचणी उड्डाण केले. ते येथेच परतणार होते. मात्र, १.१० वाजता ते घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरातील झाडाला धडकले. नंतर पेट घेऊन विमान निर्माणाधीन इमारतीवर कोसळले. स्फोट होऊन त्याचे तुकडे झाले. विमानातील कॅ. प्रदीप राजपूत (४०), सहवैमानिक मारिया झुबेरी (४०), सुरभी (३५, तंत्रज्ञ) व मनीष मांडे (३५, तंत्रज्ञ) यांचा मृत्यू झाला. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात अाले आहेत. 
 
विमानातील इंधन रस्त्यावर
कोसळत्या विमानातील इंधनाची टाकी फुटून इंधन अंगावर पडून पेटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या गोविंद पंडित यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. 
 
विमानाचा घटनाक्रम असा 
१२.२० : पूजा, नारळ फोडून जुहूवरून उड्डाण
१.१० : घाटकोपरमध्ये इमारतीवर कोसळले. 
१.१६ : अग्निशमन दलाला पहिला कॉल 
१.३७ : ३ बंब व १ जंबो वॉटर टँकर दाखल
१.३९ : एक क्रमांकाच्या आगीची सूचना 
१.४० : अर्ध्या तासानंतर आग विझविली.
 
ही असू शकतात कारणे 
1. हवामान खराब असल्यामुळे यंत्रणेत बिघाड.
2. योग्य मेंटेनन्स न राखल्याने यंत्रणेत दोष होणे.
3. विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने नियंत्रण सुटून अपघात.
 
३६ कामगार बचावले 
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ३६ मजूर काम करतात. मात्र, दुर्घटनेच्या वेळी ते सर्व दुपारच्या जेवणासाठी गेले होते. यामुळे थोडक्यात त्यांचा जीव बचावला.
 
विमानाचा अाधीही झाला होता अपघात
‘किंग एअर सी-९०’ हे बारा प्रवासी क्षमता असलेले विमान २२ वर्षांपासून वापरात होते. अलाहाबादेतील अपघातानंतर उत्तर प्रदेश सरकारने ते २०१४ मध्ये गुटखा उत्पादक दीपक कोठारी यांच्या मालकीच्या यूवाय एव्हिएशन कंपनीला विकले. इंडामेर कंपनीकडे विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम होते.
 
विमानाची आधी पूजा केली; वैमानिकाला ५ हजार तासांचा अनुभव
दुरुस्तीनंतर विमानाने प्रथमच चाचणीसाठी उड्डाण केले. चाचणीनंतर विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार होते. तत्पूर्वी, विमानाची पूजा व नारळही फोडण्यात आले होते. मुख्य वैमानिकाला पाच हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. सहवैमानिक हा पूर्वी जेट एअरवेजमध्ये होता. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या अपघातातील फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...