आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपासाठी बियाणे, खतांचा पुरेसा साठा; कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली ग्वाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - आगामी खरीप हंगामासाठी सर्व बियाण्यांचा आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेल्या कृषी योजनांच्या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. राज्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून शेतकरी आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून आगामी खरीप हंगाम फलदायी ठरेल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.   


शनिवारी मुंबईतील वांद्रे परिसरातील रंगशारदा सभागृहात खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कृषिमंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. गेल्या खरीप हंगामात मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती, तर तूर आणि हरभरा उत्पादनात वाढ झाली होती. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनही घटले. रब्बी हंगामात ज्वारीसह एकूण अन्नधान्य पिकांमध्ये सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती. हा अनुभव विचारात घेता कीटकनाशक धोरणाबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे प्रयत्न विभागामार्फत सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. शिवाय कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, कांदा चाळ, शेडनेट, शेततळ्यांना अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया या सर्व योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   


गेल्या वर्षी कृषी विभागाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमांतर्गत तीनशे कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांना १० हजार २१५ ट्रॅक्टर्स, ४ हजार ०११ पॉवर टिलर, १५ हजार ७८४ ट्रॅक्टरचलित अवजारांचे वाटप केले. याशिवाय पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे काम सुरू असून आतापर्यंत ४५० कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती फुंडकर यांनी दिली. तर लवकरच पंतप्रधान पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान,  या बैठकीला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राज्यात २ हजार मंडळांत हवामान केंद्र  

हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या स्कायमेट या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने महावेध हा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून राज्यातील २ हजार २६५ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना हवामानविषयक सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.   

 

 

बातम्या आणखी आहेत...