आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव जानकर म्हणतात, मी \'भाजप\'चा नाही; मात्र, भवितव्य अमित शहांच्या हाती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धनगर समाजाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांच्या आमदारकीचा निर्णय सर्वस्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गेला आहे. त्यांचा निर्णय सोमवारी १२ वाजेपर्यंत होईल, अशी माहिती भाजपतील सूत्रांनी दिली. 


विधानसभा सदस्यांतून परिषदेत निवडून द्यावयाच्या ११ जागांची १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडे ५ सदस्य निवडून देण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र, जानकर यांनी भाजपच्या एबी फाॅर्मवर निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार देत, रासपच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली आहे. जानकर यांच्यावरचा दबाव वाढावा यासाठी ऐनवेळी भाजपने सहावा उमेदवार दिला आहे. जानकर यांना स्वबळावर परिषदेवर निवडून यायचे असेल तर विधानसभेत त्यांना २७ आमदारांची मते हवीत. पण, विधानसभेत त्यांच्या रासप पक्षाचा एकच आमदार आहे. जानकर यांनी रासपच्या एबी फाॅर्मवर उमेदवारी दाखल केली आहे, ती भाजपला पसंत नाही. आमच्या एबी फाॅर्मवर उभे राहा, असा भाजपचा आग्रह होता. जानकर यांच्या हट्टाला वैतागलेल्या भाजपने आता अमित शहा यांच्याकडे बोट केले आहे. त्यामुळे जानकर सध्या अधांतरी आहेत. 


पशुसंवर्धनाच्या मंत्रिपदाला धोका नाही 
जानकरांनी उमेदवारी मागे घेतली तरी मंत्रिपदाला धोका नाही. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना व्यक्ती ६ महिने मंत्रिपदी राहू शकते. जानकर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. माढा किंवा सातारा मतदारसंघात चाचपणी करत आहेत. त्यामुळे भाजपने परिषदेसाठी पाठिंबा नाकारल्यास ते उमेदवारी मागे घेणे पसंत करतील. 

 
अन्यथा देशमुखांना लागेल लॉटरी  
अमित शहा यांनी जर जानकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला, तर बारावे उमेदवार पृथ्वीराज देशमुख आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल. आणि जानकर भाजप पाठिंब्याने पण रासप आमदार म्हणून निवडून येतील. अमित शहा यांनी रासपला पाठिंबा नको म्हटले, तर सांगलीचे भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना आमदारकीची लाॅटरी लागू शकते. आणि जानकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की येऊ शकते.  

बातम्या आणखी आहेत...