आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरची नोकरी सोडून मासिक पाळीचे गैरसमज केले दूर, २५ हजारांवर महिला-मुलींमध्ये जनजागृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- किशाेरवयीन मुली व महिलांत मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्नेहल चाैधरी या साॅफ्टवेअर इंजिनिअर युवतीने गलेलठ्ठ पगाराच्या करिअरला रामराम ठाेकत या संदर्भातील वैज्ञानिक ज्ञानाचे 'क्षितिज' खुले केले अाहे. राज्यातल्या विविध वयाेगटांतील सुमारे २५ हजार महिला व मुलींपर्यत मासिक पाळीसंदर्भात शास्त्रशुद्ध माहिती पाेहोचवून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यात स्नेहल यांना यश अाले अाहे. अाता दृष्टिहीन व विशेष मुलांच्या समस्या साेडवण्याचे लक्ष्य ठेवले अाहे. 


वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार या खेड्यात जन्मलेल्या स्नेहल चाैधरी यवतमाळच्या दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्यात आली. त्यातूनच अनाथाश्रमातील मुलांशी मैत्री झाली व तेही तिच्याशी मनमाेकळेपणाने व्यक्त होऊ लागले. अापल्याला ब्लड कॅन्सर झाला या गैरसमजुतीतून १३ वर्षीय अनाथ मुलीने स्वत:ला खाेलीत बंद करून घेतले हा माझ्यासाठी माेठा धक्का हाेता. अाई-वडील नाहीत म्हणून मासिक पाळीबाबत या मुलांचे प्रश्न अनुत्तरित अाहेत, असे सुरुवातीला वाटले. पण पालक असलेल्या मुली व महिलांतही याबाबत गैरसमज असून या विषयावर बाेलणे लज्जास्पद, अश्लील असल्याचे लक्षात अाले. अनाथ मुलीचा हा अनुभव माझ्या सामाजिक क्षेत्राकडे वळण्यासाठी 'यू टर्न' ठरला असे स्नेहल यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले. 


एकविसाव्या शतकातही मासिक पाळीला शाप समजले जाते. अाजार समजून मुली शाळा साेडतात, लाजिरवाणा विषय म्हणून शिक्षक चर्चा करीत नाही. हे चित्र बदलणे नव्या पिढीची जबाबदारी अाहे असे मानून स्नेहलने 'क्षितिज फाउंडेशन' संस्थेच्या माध्यमातून 'ब्लीड द सायलेन्स' चळवळ सुरू केली. ती सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालये, अंगणवाडीत जाऊन व्याख्याने देऊन जनजागृतीचे काम करत आहे. 


घरातूनच झाला विरोध 
अशा विषयावर काम करत असल्याचे पाहून काहींनी स्नेहल यांच्या आईवडिलांकडे तक्रारी केल्या. त्यांचाही यामुळे विरोध होऊ लागला. मात्र, नंतर मासिक पाळीबाबतचे गैरसमज अाणि त्यातून हाेणारे गंभीर विकार यासंदर्भात त्यांनी अापल्या पालकांना समजावून दिल्यानंतर त्यांचाही विराेध मावळला अाणि त्यांच्याकडूनही नंतर प्राेत्साहन मिळत गेले. 


मासिक पाळीबद्दल पहिलाच लेख मुलाचा 
स्नेहलच्या मते, माेहीम सुरू करण्यापूर्वी पुरुष या चळवळीला विराेध करतील अशी भीती वाटत हाेती. परंतु पहिलाच लेख एका मुलाने लिहिला. 'त्या' दिवसांत बहिणीला काय अडचणी येतात याची त्याला जाणीव झाली. विविध क्षेत्रांतील अधिकारी, लेखक, डाॅक्टर, अभिनेते, कचरा वेचणाऱ्या स्त्रिया अशा सर्वच वयाेगटांतील व्यक्ती गेल्या चार वर्षात या चळवळीचा एक भाग बनल्या अाहे. 

बातम्या आणखी आहेत...