आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाळ्या-खुरकुत लस खरेदी रखडल्याने विराेधकांचा जाब; मंत्री जानकरांकडून माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात रखडलेल्या लाळ्या-खुरकुत लसीकरणावर पशुसंवर्धन  मंत्री महादेव जानकर यांच्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधकांनी चौकशीची मागणी करत विधानसभेत मंगळवारी  सभात्याग  केला. दरम्यान, ही लस खरेदी रखडल्यामुळे शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागून लस खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे जानकर यांनी विधानसभेत सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी आमदारांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. मात्र, त्या वेळी राखून ठेवलेल्या मंगळवारी पुन्हा चर्चा घेण्यात आली.   


 जानकर म्हणाले, ई-टेंडरिंगनुसार ही खरेदी प्रक्रिया होत असल्याने मंत्री फक्त दर ठरवतात, इतर प्रक्रिया तर आयुक्तालय स्तरावरून होते. निविदा रद्द करण्यामागची तांत्रिक कारणेही त्यांनी स्पष्ट केली. देशात फक्त मे. इंडियन इम्युलॉजिकल्स कंपनी, बायोव्हेट प्रा.लि. आणि ब्रिलियन्स बायो फार्मा, बंगळुरू या तीनच कंपन्या या लसीची निर्मिती करतात, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, राज्यातील २ कोटी १० लाख लाळ्या-खुरकुत रोगापासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी गाय, बैल, म्हशींना सरकारकडून वर्षातून दाेनदा लस देण्यात येते.  मात्र, गेल्या वर्षभरापासून लसीकरणासाठी सात वेळा निविदा मागवण्यात आल्या. मात्र लस मिळाली नाही. त्यामुळे दूध उत्पादनावरही परिणाम होत आहे. सातव्या निविदेत पशुसंवर्धन विभागाने बायोव्हेट  कंपनीकडून ७ रुपये ७० पैसे दराने लस खरेदी केली. याच कंपनीने ही लस पंजाबमध्ये ६ रुपये २५ पैसे, पश्चिम बंगालमध्ये ६ रुपये ३३ पैसे दराने दिली आहे. मग राज्यात वाढीव दराने कंपनीला हे कंत्राट कसे दिले हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

लस खरेदीची न्यायालयीन चाैकशी करा : पृथ्वीराज चव्हाण  
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मे. इंडियन इम्युलॉजिकल्स ही निमसरकारी कंपनी आहे. त्याऐवजी दुसऱ्या खासगी कंपनीला हे कंत्राट का दिले हे सांगून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, यासंदर्भात मंत्री जानकर यांनी कोणतीही ठोस घोषणा न केल्याने विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवत सभात्याग केला.  

बातम्या आणखी आहेत...