आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात दर 15 मिनिटाला एका अल्पवयीन मुलावर अत्याचार, 50 टक्के गुन्हे पाच राज्यांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात दर पंधरा मिनिटांना एक अल्पवयीन मूल लैंगिक अत्याचाराचे बळी ठरत आहे. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही पाचपटींनी वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येवरून देशभर जनक्षोभ उसळलेला असतानाच क्राय या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालाद्वारे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबतची ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.  


बालकांच्या हक्कांसाठी गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्राय (चाइल्ड राइट्स अँड यू) या स्वयंसेवी संस्थेने केंद्र सरकारच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरोच्या गेल्या दहा वर्षांतील बाल गुन्हेगारीविषयक वार्षिक अहवालांचे विश्लेषण केले असता काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. देशात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचले असून २००६ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे १८ हजार ९६७ गुन्हे देशभरात नोंदवण्यात आले, तर अवघ्या दहा वर्षांत हे प्रमाण पाचपटींनी वाढले असून २०१६ मध्ये १ लाख ६ हजार ९५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये बाल अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये मुलांवरील अत्याचाराच्या नोंदवल्या गेलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी एकतृतीयांश म्हणजे जवळपास ३३ टक्के गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे म्हणजेच पोक्सो कायद्यांतर्गत (लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठीचा कायदा) नोंदवण्यात आले होते. त्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याची बाब क्रायने आपल्या अहवालात नमूद केली आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या वाढीबाबत मत व्यक्त करताना  क्रायच्या धोरणविषयक सल्लागार आणि संचालक कोमल गणोत्रा म्हणाल्या की, बालकांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात आपण अपयशी ठरत असल्याचे हे द्योतक आहे. कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, दोषसिद्धीचा अल्पदर, निधीची अपुरी तरतूद अशा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

 

५० टक्के गुन्हे पाच राज्यांत  
देशभरात नोंदवलेल्या बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी तब्बल ५० टक्के गुन्हे हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये नोंदवण्यात येतात. यापैकी उत्तर प्रदेशात १४ टक्के, मध्य प्रदेशात १३ टक्के, महाराष्ट्र १३ टक्के, दिल्ली पाच टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये ६ टक्के सरासरी गुन्ह्यांची नोंद होते.

 

बातम्या आणखी आहेत...