आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायात खासदारांवर भाजपच नाराज, सात ते अाठ जणांचे तिकीट कापणार?; पक्षाचे काम न केल्याचा ठपका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या लाटेत महाराष्ट्रात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून काही मातब्बर नेते अायात करून त्यांना खासदारकीला निवडूनही अाणले. परंतु गेल्या चार वर्षांत यापैकी काही आयात खासदारांनी पक्षासाठी काहीच भरीव काम केले नसल्याचा निष्कर्ष भाजपच्या संघटनमंत्र्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात अाला अाहे. त्यामुळे अशा अायात खासदारांवर पक्षश्रेष्ठी नाराज असून २०१९ मध्ये त्यांचे तिकीटही कापण्याचा विचार केला जात अाहे. दरम्यान, चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील भाजपच्या २३ खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले अाहे. संघटनमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या अहवालांवरच अाता भाजपच्या खासदारांचे भवितव्य ठरणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 


२०१४ मध्ये असलेली भाजपची लाेकप्रियता गेल्या चार वर्षांत घसरत चालल्याची प्रचिती काही राज्यांतील पाेटनिवडणुकांमधून येत अाहे. त्यामुळे अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र माेदी सावध झाले अाहेत. २०१९ मध्येही काेणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचीच सत्ता अाणण्यासाठी त्यांनी कंबर कसली अाहे, त्यासाठी मित्रपक्षांची मनधरणीही सुरू केली अाहे.  दुसरीकडे गेल्या चार वर्षांतील कामगिरीचा अाढावा घेत भाजप खासदारांचे प्रगतिपुस्तकही तयार केले जात अाहे. सूरजकुंड येथे झालेल्या बैठकीत संघटनमंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. संघटनमंत्री पक्षाच्या खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते एक महिन्याच्या आत अमित शहा आणि नरेेंद्र मोदी यांच्याकडे पाठवणार आहेत.   


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनमंत्र्यांनी देशभरातील ५० च्या आसपास खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा मारला आहे. यात महाराष्ट्रातील काही निष्ठावंतांसह अायात खासदारांचाही समावेश अाहे. या खासदारांनी मतदारसंघात काय काम केले, पक्ष मजबुतीसाठी काय केले आणि केंद्राच्या किती योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या, लाेकांना त्याचा किती लाभ मिळवून दिला या गाेष्टींवर प्रगतिपुस्तकात भर देण्यात अाला अाहे. त्यात काही आयात खासदारांनी नरेंद्र मोदी लाटेत विजय मिळवला; परंतु खासदार झाल्यावर भाजपसाठी काहीही काम केले नसल्याचे समोर आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या खासदारांची नावे मात्र पक्षाने गाेपनीय ठेवली अाहेत. 


सात ते अाठ खासदारांचे तिकीट कापणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या वर्षी राज्यातील खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार केले होते. त्यात २३ पैकी ११ खासदार नापास ठरले होते. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन या खासदारांना कामगिरी सुधारण्यास सांगितले होते. यापैकी काही खासदारांनी आपली कामगिरी सुधारली आहे. मात्र उर्वरित काही खासदारांची नावेही संघटनमंत्र्यांच्या यादीत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील भाजपच्या जवळपास ७ ते ८ खासदारांचा पत्ता २०१९ मध्ये कट होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

 

भाजपचे अायात खासदार 
१. नंदुरबार : हिना गावित (अाधी : काँग्रेस)

२. भिवंडी : कपिल पाटील (अाधी : राष्ट्रवादी)

३. धुळे : सुभाष भामरे (अाधी : शिवसेना)

४. सांगली : संजय पाटील (अाधी : काँग्रेस)

५. पालघर : राजेंद्र गावित (अाधी : काँग्रेस). 
>अायात नेत्यांपैकी काही व मूळ भाजपच्या काही खासदारांवर भाजप नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...