आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Christian Community बद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य: खासदार गोपाळ शेट्टींनी राजीनामा घेतला मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-     ख्रिश्‍चन समुदायावरील वक्‍तव्‍यावरुन वादात अडकलेले उत्‍तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांनी फेटाळून लावला आहे. तसेच गोपाळ शेट्टी यांची समजूत घालण्‍यातही रावसाहेब दानवेंना यश आले आहे. यामुळे गोपाळ शेट्टींनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.

 

गुरूवारी मुंबईतील एका कार्यक्रमात गोपाळ शेट्टी यांनी देशातील ख्रिश्‍चन धर्मीयांना 'इंग्रज' म्‍हटले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आज व्‍हायरल झाल्‍याने गोपाळ शेट्टींवर चहुबाजूंकडून टीका करण्‍यात येत होती. तसेच पक्षश्रेष्‍ठींनीही त्‍यांना याप्रकरणी झापल्‍याने ते नाराज असल्‍याची चर्चा होती. त्‍यामुळे ते आज (शुक्रवारी) कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्‍यता दुपारपासूनच वर्तविण्‍यात येत होती. तत्‍पूर्वी 'मी कोणत्‍याही पद्धतीने पक्षाची बदनामी होईल, असे काही करू इच्छित नाही. पक्षासाठी जे योग्‍य असेल ते करण्‍यासाठी मी तयार आहे.', अशी प्रतिक्रिया राजीनाम्‍यापुर्वी त्‍यांनी माध्‍यमांना दिली होती.

 

नेमके काय म्‍हणाले गोपाळ शेट्टी?

- मलाड येथील मालवानीमध्‍ये शिया कबरस्‍थान समितीद्वारे आयोजित कार्यक्रमात शेट्टी म्‍हणाले की, 'ख्रिश्‍चन धर्मीयांनी भारताच्‍या स्‍वांतत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. ते इंग्रज होते. भारताला हिंदु आणि मुस्लिम यांनी एकत्रित लढून स्‍वातंत्र्य मिळवून दिले आहे.'


वक्‍तव्‍य मागे घ्‍या, पक्षाचे शेट्टींना आदेश 
- याबद्दल मुंबई भाजपचे अध्‍यक्ष आशिष शेलार यांनी म्‍हटले आहे की, 'भाजप कोणत्‍याही प्रकारे शेट्टींच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करत नाही. तसेच पक्षाचे हे अधिकृत वक्‍तव्‍यही नाही. आम्‍ही इतर समुदायांप्रमाणेच ख्रिश्चन धर्मीयांचाही आदर करतो. पक्षातर्फे त्‍यांना आपले वक्‍तव्‍य मागे घेण्‍यास सांगण्‍यात आले आहे.'

- दुसरीकडे काँग्रेसनेही गोपाळ शेट्टींवर टीका करताना, हे वक्‍तव्‍य भेदभावपुर्ण आणि भडकाऊ असल्‍याचे म्‍हटले आहे.

 

नाराज गोपाळ शेट्टींनी प्रदेशाध्‍यक्षांकडे सादर केला होता राजीनामा

- ख्रिश्‍चन धर्मीयावरील वक्‍तव्‍यावरून पक्षश्रेष्‍ठींनी झापल्‍याने खासदार गोपाळ शेट्टी प्रचंड नाराज झाले होते. त्‍यामुळे आज दुपारी त्‍यांनी राज्‍याचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांच्‍याकडे आपला राजीनामाही सादर केला होता.

- मात्र भेटीदरम्‍यान एवढ्याशा कारणावरून राजीनामा देण्‍याची गरज नाही, असे रावसाहेब दानवे यांनी गोपाळ शेट्टींना सांगितल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

- त्‍यामुळे अवघ्‍या काही तासांतच गोपाळ शेट्टींनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. तत्‍पूर्वी राजीनामा देण्‍याची घाई करू नका, असा सल्‍लादेखील रावसाहेब दानवे यांनी गोपाळ शेट्टींना दिला होता.

 

वक्‍तव्‍याचा चुकीचा अर्थ काढला- खासदार गोपाळ शेट्टी
-  राजीनामा देण्‍यापूर्वी आपल्‍या वक्‍तव्‍याबद्दल स्‍पष्‍टीकरण देताना शेट्टींनी म्‍हटले होते की, 'माझ्यासाठी भारत व भारतीय सर्वात आधी आहे. माझ्या वक्‍तव्‍याचा चुकीचा अर्थ लावण्‍यात आला. मी समाज जोडण्‍याचे काम करतो. माझ्या काही वक्‍तव्‍यांमुळे एखादा समाज दुखावला असेल तर मला पदावर राहण्‍याचा अधिकार नाही.'

- 'पंतप्रधान मोदींच्‍या सबका साथ सबका विकास या धोरणानुसारच आपल्‍याला वागायचे आहे. मी देखील सर्व माझे, मी सर्वांचा असाच विचार करतो', असे गोपाळ शेट्टी म्‍हणाले होते.
- गोपाळ शेट्टी हे उत्‍तर मुंबईचे खासदार असून 2014 लोकसभा निवडणुकीमध्‍ये त्‍यांनी कॉंग्रेसच्‍या संजय निरूपम यांचा तब्‍बल 4 लाख 56 हजार मतांनी पराभव केला होता.