आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिका पोटनिवडणूक: भाजपच्या प्रतिभा गिरकर 7 हजार मतांनी विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 21 मधून भाजपच्या उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांनी विजय मिळवला आहे. प्रतिभा गिरकर यांनी तब्बल 7122 मतांनी मोठा विजय मिळवला आहे. भाजपच्या प्रतिभा गिरकर यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

 

प्रतिभा गिरकर यांनी काँग्रेसच्या नीलम मांढले यांना पराभूत केले. भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. प्रतिभा गिरकर या शैलजा गिरकर यांच्या सूनबाई आहेत.

 

यासाठी बुधवारी मतदान झाले होते. यात केवळ 29 टक्के मतदान झाले होते. पहिल्या फेरीपासून गिरकर आघाडीवर होत्या. अखेर गिरकर यांना 9106 तर नीलम मांढले यांना 1984 मते मिळाली. अशा प्रकारे गिरकर यांनीी तब्बल 7122 मतांनी मोठा विजय मिळवला. दरम्यान, प्रतिभा गिरकर यांच्या या विजयाने मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ 83 वर पोहचले आहे. 

 

शिवसेनेने दिला होता पाठिंबा- 

 

भाजपच्या शैलजा गिरकर या चारकोप वॉर्ड क्रमांक 21 मधून निवडून आल्या होत्या. मात्र 10 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक लागली. शैलजा गिरकर यांनी 1997 पासून ते आतापर्यंत असे तब्बल 20 वर्ष नगरसेवकपद भूषवले. त्यांनी उपमहापौरपदही भूषवले होते. त्यामुळे या जागेसाठी भाजपने त्यांची सूनबाई यांना तिकीट दिले. यानंतर पाठिंब्यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे जुने संबंध आहेत. गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरेंने पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...