आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे विभागप्रमुख, पदाधिकाऱ्यांची \'कृष्णकुंज\'वरील बैठक संपली; दिले हे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फेरीवाला झोनच्या पार्श्वभूमीवर मनसेचे विभागप्रमुख, पदाधिकाऱ्यांची 'कृष्णकुंज' वरील बैठक संपली आहे. राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हॉकर्स झोन आणि नियम याबाबतची प्रत दिली आणि त्याचा अभ्यास करून आपापल्या विभागात हॉकर्स झोन बाबत हरकती सूचना नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. फेरीवाल्यांविरोधात सदोदित खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील कृष्णकुंज निवासस्थानाचा परिसर मुंबई महानगरपालिकेने चक्क फेरीवाल्यांसाठीच मोकळा केला आहे.

 

 

फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या राज ठाकरे यांच्या घराबाहेर आता कायद्याने फेरीवाले बसणार आहेत. महानगरपालिकेच्या या धोरणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मनावर घेतले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला “मातोश्री’चा कलानगर भाग नो हाॅकर्स झोनमध्ये टाकण्यात आला आहे.   

 

 

केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन करण्याबाबत फेरीवाल्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली होती. त्यानुसार मुंबई महापलिकेने पालिका हद्दीतील 24 विभागांत 1 हजार 366 रस्त्यांवर तब्बल 85 हजार 891 फेरीवाल्यांना अधिकृतपणे बसवण्यासाठी ठिकाणांची यादी जाहीर केली आहे.

 

 

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यालय असलेल्या माटुंगा मधील पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० फेरीवाले बसतील.  शिवाजी पार्कातील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर १० फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे.  धक्कादायक म्हणजे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कलानगरच्या मातोश्री बंगल्याचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये टाकण्यात आला आहे. या दुजाभावी धोरणामुळे मनसेत संतापाची लाट पसरली आहे. नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर १००, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर ३१० फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते, त्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवण्यास मनसेचा विरोध आहे. 

 

 

शिवसेनेचा मात्र सबुरीचा सल्ला  
मनसे सैनिकांनी राज यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मनसेची बैठक सुरु आहे. त्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे पालिकेतील मनसे नगरसेवकाने सांगितले. हरकती, सूचना आल्यानंतर फेरीवाला धोरण अंतिम होणार अाहे. त्यामुळे कोणी याबाबत विनाकारण टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन शिवसेनेचे पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केले आहे. फेरीवाल्यांना थेट कृष्णकुंजबाहेर बसण्यास संमती देऊन शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेने राज यांना काव्यगत न्याय दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...