आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी महिला नोकरदार वर्गासाठी खूषखबर: या कारणामुळे आपल्या घराजवळ बदली मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना आपल्या पतीच्या आई-वडिलांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तवही महसुली विभाग बदलून मिळण्यासाठी विनंती अर्ज करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महसूली विभाग वाटप नियम - 2015 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरजू महिला अधिकाऱ्यांची सोय होणार आहे.

 

राज्य शासनातील गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम - 2015 तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना स्वत: किंवा आपला जोडीदार, मुले अथवा अवलंबून असलेले आई-वडील यांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तव महसूल विभाग बदलण्यासाठी विनंती अर्ज करण्याची मुभा होती. यामध्ये सुधारणा करून आता महिला अधिकाऱ्यांनाही आपल्या सासू-सासऱ्याच्या सुश्रुषेसाठीही महसुली विभाग बदलून मिळण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

यासोबतच महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी आपापसात महसुली विभाग (Mutual Change) बदलून देण्याची  विनंती केल्यास बदली करण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.