आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- कमला मिल आवारातील आग दुर्घटना प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तात्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कमला मिल आवारातील आगीच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासह या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
आज पहाटे मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत 14 नागरिकांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांकडून या घटनेबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
आदित्य ठाकरेंनीही दिली भेट-
दरम्यान, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही कमला मिल्स कपाऊंडला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणी या चुकीचे घडले याची माहिती घेतली जाईल, चौकशी केली जाईल. तसेच यात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व राहुल गांधींचे टि्वट जे त्यांनी मराठीत केले.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.