आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे व्यवहार तूर्त थांबवले; मुख्यमंत्री काल म्हणाले घोटाळा नाही, आज व्यवहार स्थगित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना (सातारा) नवी मुंबईत २४ एकर भूखंडाचे वाटप केल्यानंतर ते भूखंड अवघ्या २ महिन्यात कवडीमोलाने बिल्डरांनी खरेदी केलेल्या वादग्रस्त जमिनीच्या सर्व व्यवहारांना स्थगिती दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. त्यांच्या या यु टर्नमुळे घोटाळा बाहेर काढणाऱ्या काँग्रेसचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री आणि भाजपा बॅकफूटवर गेले आहेत. 


'या वादग्रस्त जमिनीची खरेदी, विक्री, भाड्याने देणे, घेणे असे व्यवहार न्यायालयीन चौकशीचा अहवाल येईपर्यंत कोणासाही करता येणार नाहीत, असे आदेश आपण आजच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितले. या प्रकरणी गुरुवारी विधानसभेत गदारोळ झाला हाेता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या वादग्रस्त जमिनींबरोबरच आघाडी सरकारच्या काळात वाटप केलेल्या २०० जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याचे जाहीर केले. हा विषय येथेच संपला असे विरोधकांनी गृहीत धरले हाेते. मात्र शुक्रवारी अचानक मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या त्या २४ एकर जमिनीच्या व्यवहारावरांवर निर्बंध घातल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निवेदनाने सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे जाणवले. 


मागच्या आठवड्यात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ५०० कोटीचा दावा दाखल केला. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळातील भूखंडांच्याही चौकशीचे स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना आपण बधत नसल्याचे सूचित केले होते. मात्र त्यानंतर २४ तासांतच मुख्यमंत्र्यांनी त्या जमिनीच्या व्यवहारांवर निर्बंध लादून विरोधकांसमोर नांगी टाकली.

 
मुख्यमंत्र्यांना भिती 
जिल्हाधिकाऱ्यानी प्रकल्पग्रस्तांना २४ एकर जमिनीचे वाटप करण्यापूर्वीच त्या जमिनीचे खरेदीपत्र बिल्डरांनी केले होते. ते खरेदीपत्र आपल्याकडे आहे, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. हे प्रकरण अंगाशी येईल, अशी भिती मुख्यमंत्र्यांना वाटते आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी जाहीर केली असतानाही जमिनीच्या व्यवहारांना स्थगिती देऊन बचावात्मक पवित्रा घेतल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे. 


सरकार झुकले : विखे पाटील 
अखेर सत्यासमोर सरकारला झुकावेच लागले असून, नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...