आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेतील अपक्ष आ.परिचारकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी साेमवारी प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेतील अपक्ष अामदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी विधान परिषदेने कायम ठेवला. मात्र, याला आक्षेप घेणारे शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी सदस्यत्व रद्द करण्यासाठी सोमवारी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले.  


गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू हाेताच अनिल परब यांनी प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याबाबत बुधवारी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित करत अाक्षेप घेतला. सीमेवरच्या जवानांबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द काढणाऱ्या सदस्याचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव बुधवारी गदारोळात मंजूर करण्यात आला. हा सभागृहाचा अवमान आहे. हा ठराव सभापतींनी मागे घ्यावा. परिचारक यांच्या या विधानावर सभागृह तीन दिवस बंद होते. परिचारक यांचे निलंबन रद्द करणे हा जवानांचा अपमान आहे, असे परब म्हणाले.  


सभापती रामराजे नाईक निंबाळकर यावर म्हणाले, या ठरावाचा मी साक्षीदार आहे. त्यांचे निलंबन कोणाला मान्य नव्हते. परिचारक यांनी व्यक्त केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत माझ्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने चौकशी केली. त्यांना दीड वर्ष निलंबित केले. अनेकवेळा ऊहापोह केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. निलंबनाच्या निर्णयाबाबत नेमके काय झाले याची माहिती घेऊन आपण निर्णय देऊ, असे ते म्हणाले. दरम्यान, सभापती निर्णयाला स्थगिती देऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी लगेच सांगितले. सुनील तटकरे यांनीही या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी यावर आजच निर्णय देण्याचे जाहीर केले.  

 

निलंबन रद्दचा निर्णय झाला एकमताने 
परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सभागृहाने एकमताने घेतला आहे. एखाद्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे किंवा रद्द केलेले सदस्यत्व मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव संसदीय कामकाजमंत्री किंवा सभागृहाचे नेते मांडतात. विरोधी पक्षाकडून असा प्रस्ताव मांडल्याचा इतिहास नाही. एखाद्या सदस्याचे निलंबन कायम ठेवावे किंवा कायमचे निष्कासित करावे यासाठी नोटीस देऊन प्रस्ताव देण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे, असे सभापती म्हणाले. त्यावर आपण सोमवारी नोटीस देऊन तसा प्रस्ताव देऊ, असे आमदार अनिल परब यांनी   या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...