आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात, राज्यात सत्तेत असलेल्या ताकदीच्या भाजपच्या पासंगालाही पुरणार नाही शिवसेना?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय कार्यकारिणीने यापुढे भाजपशी युती नाही असे सांगत लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्याआधी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे निवड झाली. सोबतच उद्धव यांनी आपल्या टीममध्ये काही चेहरे नवीन सामावून घेतले. मुलगा आदित्य त्याला युवा सेनेची जबाबदारी ठेवत शिवसेनेचे नेतेपद बहाल केले गेले. अनुभवी नेते व मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, तेजतर्रार मंत्री एकनाथ शिंदे यांचीही नेतेपदी वर्णी लावत ताकदीचे शिलेदार सोबत घेतले. 

 

केंद्रीय मंत्री अनंत गिते कोकणातून येतात. एकनाथ शिंदे यांची ठाणे पट्ट्यात एकहाती पकड आहे. विदर्भातून निष्ठावंत शिवसैनिक आनंदराव अडसूळ यांना तर मराठवाड्यातून चंद्रकांत खैरे यांना संधी देत भौगोलिक व विभागीय समतोल साधला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडे खरोखरच भाजपला टक्कर देऊ शकेल अशी संघटनात्मक पातळीवर नेत्यांची फळी आहे का? असे विचारले असता त्याचे उत्तर नाही असेच आहे. मात्र, शिवसेना कधीच बड्या नेत्यांसाठी ओळखली गेली नाही व आजही ओळखली जात नाही. सामान्य नागरिक व मराठी माणूस या मुद्यांवर त्यांचा पक्ष फिरतो व मर्यादित यश मिळवतो. मात्र, नेते नसले तर या पक्षाला नामोहरमही करता येत नाही हे अनेक वर्षाच्या निवडणुकीत दिसून आले आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हापासून या पक्षाचे नेतृत्त्व आले आहे तेव्हापासून गुंडांची शिवसेना ही प्रतिमा पुसून टाकली आहे. या पक्षाला आता मध्यमवर्गीय व उच्च वर्गातून अलीकडच्या काळात प्रतिसाद मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचे हे प्रकारचे यश मानावे लागेल. जात-पात न मानता कार्यकर्त्यांना संधी देणे असो की सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे असो त्यामुळे शिवसेनेबाबत एक मराठी माणसांत आपुलकी आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने रस्त्यावरील कार्यकर्त्यांना खासदार-आमदार मंत्री केले. हीच ताकद त्यांच्या आजही उपयोगी पडते. आता उद्धव ठाकरेंनी नव्या शिलेदारांच्या नियुक्त्या करताना संघटनात्मक पातळीवर प्रत्येक तीन महिन्याचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या 25 जागा आणि विधानसभेच्या मोजक्या 150 जागांवर ते लक्ष केंद्रित करू शकतात.

 

भाजपला टक्कर देणे शिवसेनेला अवघड-

 

शिवसेना आज ताकदवान बनलेल्या भाजपला कोणत्याच पातळीवर टक्कर देऊ शकत नाही. कट्टर शिवसैनिक ही एकमेव शिवसेनेची जमेची बाजू तर त्याच तोडीची भाजपकडे शिस्तप्रिय व बौद्धिक-वैचारिक असलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, देशात, राज्यात व राज्यातील मुंबई वगळता प्रमुख शहरात भाजपची सत्ता आहे. आज मितिला इतर पक्षातील लोकांचा कलही भाजपमध्ये जाण्यासाठी दिसतो यावरून भाजपच्या ताकदीचा अंदाज यावा. सत्ता, उद्योगपती ते संधीसाधू वर्ग आज भाजपच्या जवळ आहे त्या तुलनेत शिवसेनेचे हात रिकामे असल्याचे दिसते. मात्र, जनता- जनार्धन हीच ताकद समजली तर भले भले लोळू शकतात तेव्हा अशा ताकदीचा काहीही उपयोग होत नाही. तसे असते तर बलाढ्य काँग्रेस कायमच सत्तेत राहिली असती. मात्र, आज मितीला भाजप शिवसेनेपेक्षा कैक पटीने ताकदवान आहे हे ही तितकेच खरे.

बातम्या आणखी आहेत...