आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७६७ काेटींचा भूखंड फक्त ३ काेटीत; CMच्या मदतीने घाेटाळा : काँग्रेसचा थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी मुंबई येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून २४ एकरचा माेक्याचा भूखंड अवघ्या ३ कोटींत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी केला. संबंधित जमीन सिडकोच्या ताब्यात असतानाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून दबाव आणत या जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने तहसीलदारांमार्फत हस्तांतरण केल्याचे ते म्हणाले. भाजपने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र, बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच हे आरोप झाल्याने सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांकडे चालून आली आहे. 


निरुपम यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हेही उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, विस्थापितांना शेतीची जमीन देण्याचा नियम असताना या शेतकऱ्यांना शहरातील जमीन कशी दिली. शिवाय नियमाप्रमाणे १० वर्षे ही जमीन विकता येत नाही, मग हा व्यवहार कसा झाला? याची चौकशी व्हावी. सुरजेवाला यांनी, हे जमीन हस्तांतरण ताबडतोब रद्द करून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.


आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीत जनतेचे प्रश्न पुन्हा लटकणार
बुधवारपासून नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कर्जमाफीत गोंधळ, पीक कर्ज नियोजनाचा बोजवारा, प्लास्टिक बंदी व जमावाद्वारे मारहाणीच्या वाढत्या घटना अशा गंभीर व सर्वसामान्यांशी निगडित मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित असतानाच काँग्रेसच्या नव्या आरोपांमुळे अधिवेशनाचा नूर पालटण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधक कसे आक्रमक होतात आणि त्याला सत्ताधारी कशा पद्धतीने तोंड देतात यावर अधिवेशनाचे भवितव्य ठरणार आहे.


काँग्रेस : जमीन सिडकाेची, उद्यानाचे अारक्षण, तरीही हस्तांतरण
1 > काँग्रेसच्या आरोपानुसार, कोयना प्रकल्पात विस्थापित ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबईतील नियोजित विमानतळाजवळ रांजणपाडा परिसरात २४ एकर जमीन दिली होती. मोक्याच्या ठिकाणच्या या जमिनीची बाजारभावानुसार किंमत १,७६७ कोटी इतकी असून अवघ्या ३.६० कोटींत खरेदी करण्यात आली.
2 > जमीन खरेदी करणारे बिल्डर मनीष भटिजा, संजय भालेराव हे भाजप आ. प्रसाद लाड यांचे निकटवर्तीय आहेत. सिडकोच्या अखत्यारीतील या जमिनीवर उद्यानाचे आरक्षण आहे. तरीही तिचे हस्तांतरण तहसीलदारांमार्फत झाले. महसूल विभाग व मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपाशिवाय ही बाब शक्य नाही. 


भाजप : रेडीरेकनरनुसार किंमत ५ कोटी, १७६७ कोटी अाले कुठून ? 
3 > काँग्रेसच्या या आरोपावर तातडीने पत्रकार परिषद घेत भाजपने खुलासा केला. काँग्रेसने केलेला जमीन घोटाळ्याचा आरोप फेटाळत असल्याची प्रतिक्रिया माधव भांडारी यांनी दिली आहे. आजच्या रेडी रेकनरनुसार या जमिनीची आजची किंमत ५ कोटी २९ लाख इतकी आहे. त्यामुळे १७६७ कोटी ही किंमत काँग्रेसने कोणत्या आधारावर निश्चित केली, असा सवालही त्यांनी केला. 
 

काँग्रेस : बाजारभावाने अशी १७६७ कोटी किंमत
4 > बाजारभावानुसार खारघर परिसरात व्यावसायिक वापरासाठीच्या जमिनीला साधारण १.८४  लाख रुपये प्रतिचौरस फूट इतका भाव मिळतो. या हिशेबाने २४ एकर म्हणजेच ९८,१२५ चौरस फूट क्षेत्रफळाला १,७६७ कोटी इतका भाव मिळाला असता, असा दावा काँग्रेसने केला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...