आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या पुस्तकात भाजपचे काैतुक, 8 दिवसांत पुस्तके बदला : सुप्रिया सुळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप हा परंपरा, संस्कृतीचा रक्षक व आर्थिक सुधारणा करणारा पक्ष आहे, अशी टिमकी वाजवत दहावीच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून भाजप आपला राजकीय विचार रुजवू पाहत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आता पाठ्यपुस्तकेही राजकीय पक्षांच्या छुप्या प्रचाराचे साधन बनू पाहत आहे. याविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून शालेय शिक्षणात राजकारण आणून हे सरकार विद्यार्थ्यांना चुकीची शिकवण देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.   


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या इयत्ता दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकात राजकीय पक्षांवरच एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. या धड्याच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय भूमिकेचा उदोउदो करण्यात आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

 

भाजपने स्वत:चा उल्लेख आर्थिक सुधारणावादी पक्ष असा करतानाच शिवसेना हा मराठी माणसांच्या हक्काची जपणूक करण्यासाठी, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी, तसेच परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. अशा आशयाची माहिती या धड्यात दिली आहे. चीन आणि रशिया यापैकी कुणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्याचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.

 

घराणेशाही ही भारतीय लोकशाहीसमोरील सर्वात माेठी समस्या असून राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाही संकुचित झाल्याचा शेरा मारत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याची चर्चा आहे.  

 

आठ दिवसांत पुस्तके बदला : सुप्रिया सुळे   
शालेय पाठ्यपुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख असणे हे महाराष्ट्रात प्रथमच घडत अाहे. शिक्षणात यापूर्वी कधीही राजकारण आले नव्हते. मुलांना काही चुकीचे शिकवू नका, असे आवाहन करत आठ दिवसांत पुस्तके बदलली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

 

बातम्या आणखी आहेत...