आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या उपचारावरून खडाजंगी; मंत्री दिवाकर रावतेंच्या वक्तव्यावर अाक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये  शाब्दिक खडाजंगी झाली.  


प्रश्नोत्तरांच्या तासापूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भुजबळांच्या उपचाराचा मुद्दा उपस्थित केला. साेमवारी काही अामदारांनी एका आरोपीच्या उपचाराबाबत चर्चा करताना जेजे रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालये चांगली आहेत, असे सांगून सरकारी रुग्णायालयांचा अवमान केला अाहे. त्यामुळे अाराेग्य मंत्र्यांनी याबाबत निवेदन करावे, अशी मागणी केली. मात्र,  सदस्यांनी सरकारी रुग्णालयावर अथवा ‘जेजे’वर अविश्वास व्यक्त केला नव्हता, तर भुजबळ यांना तपासणीसाठी रांगेत थांबावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.  मात्र, रावते यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे अामदार संतापले, त्यांनी गदाराेळ घातला. त्यामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.  


विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा भुजबळांच्या उपचाराचा मुद्दा लावून धरला. सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही. गोंधळ घालत कामकाज रेटण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. भुजबळ आरोपी असले तरी त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. कसाब, तेलगीसारख्या लोकांना चांगले उपचार मिळतात, मग भुजबळांना का नाही, असा सवाल शेकापचे जयंत पाटील यांनी केला. सभापतींनी आपल्या दालनात बैठक घ्यावी आणि यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना, ‘भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या तब्येतीची योग्य काळजी घेण्यात येत आहे’, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...