आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधकांवर पाेलिसांची पाळत, फाेन होतात टॅप; विखेंचा अाराेप, अायुक्तांना विचारला जाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातले फडणवीस सरकार विरोधी पक्षातील नेत्यांवर पाळत ठेवत असून त्यांचे फोनसुद्धा टॅप केले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रीतीने हजेरी लावल्याचा अाराेप करत याप्रकरणी आपण राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.  


मुंबई परिमंडळ एकमधील सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सामंत आणि हवालदार बाजीराव सरगर यांनी साध्या गणवेशात गुरुवारच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. त्यांनी उपस्थित पत्रकारांचे फोटोही काढले. तसेच पत्रकार परिषदेतील टिपणेही काढली होती. हा प्रकार पत्रकारांनीच  समोर आणला. पोलिसांच्या उपस्थितीचा प्रकार लक्षात येताच विखे पाटील यांनी तत्काळ मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या संपूर्ण प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी आपण अशी कोणतीही परवानगी पोलिसांना दिली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंदर्भात विखे पाटील म्हणाले की, हा प्रकार घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षांना संविधान बचाव यात्रा काढावी लागत असून तशी वेळ का आली याचा पुरावा आज मिळाला. माझे फोन कोण टॅप करत आहे, त्या अधिकाऱ्याचे नावही मला माहित आहे. पण जेव्हा माझ्याकडे पुरावे येतील तेव्हा ते जाहीर करेन, असे विखेंनी सांगितले.

   
मंत्र्यांची कामे तत्काळ, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष  
मंत्रालयात विष प्राशन करणारे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची जेजे रुग्णालयात जाऊन विखे  पाटील यांनी गुरुवारी विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय या सरकारला जागच येत नसल्याचे ते म्हणाले. धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तत्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटीलसारख्या शेतकऱ्यास न्यायासाठी मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, अशी भीषण परिस्थिती या सरकारने राज्यात करून ठेवल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

 

पाळत ठेवणे गंभीर प्रकार : अशोक चव्हाण
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सरकारी निवासस्थानी पाेलिस पाळत ठेवत असल्याची बाब गंभीर अाहे.  काँग्रेस पक्ष त्याचा निषेध करत आहे. सरकार विरोधी पक्षावर गुप्तपद्धतीने पाळत ठेवत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत अाहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...