आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे मनपा कर्मचाऱ्याचा मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न, भरतीप्रक्रियेच्या चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/धुळे- धुळे महापालिकेतील कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयाच्या दारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बबन यशवंत झोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. 


तत्कालीन धुळे नगरपालिकेत बबन झोटे हे भरती झाले होते. मात्र, महापालिका झाल्यानंतर २००१ मध्ये बबन झोटे, निर्मला अहिरे, लक्ष्मी वसावे या तिघांना महापालिका प्रशासनाने सेवेतून कमी केले होते. त्यामुळे पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, यासाठी अनेक वर्षांपासून ते शासनस्तरावर पाठपुरावादेखील करत आहेत. तसेच तत्कालीन धुळे नगरपालिकेत १९८९ मागाासवर्गीयांची भरती झाली होती. या सरळ सेवा भरतीत धुळ्याच्या राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली, असाही त्यांचा आरोप आहे. यासाठी ते मंत्रालयात खेटे घालत होते. झोटे यांनी ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आत्महत्येची धमकी दिली होती. अखेर सोमवारी झोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर पुन्हा धुळे जिल्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. महापालिकेने सेवेतून कमी केल्यानंतर थोटे यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती. त्यात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात मनपाने गुणवत्तेच्या आधारे खंडपीठात याचिका दाखल केली. 


धर्मा पाटलानंतर पुन्हा धुळे चर्चेत 
विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रायातच विष प्राशन केले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी राज्याचे प्रशासन हादरले होते. राज्यात या मुद्दयावर राजकारणही झाले. तो शांत होत नाही तोच पुन्हा मंत्रालयाच्या आवारात मनपातील कमी केलेल्या कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पुन्हा धुळ्याचे नाव चर्चेत आले.

 

बातम्या आणखी आहेत...