आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण: शिवसेना, राणेंना खुश करतानाच काेकणी मतपेढीवर भाजपचे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा अाराेप करत  काँग्रेसच्या अामदारांनी विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हाती ‘भाेपळा’ व ‘काेरी पाटी’ घेऊन फडणवीस सरकारविराेधात निदर्शने केली. - Divya Marathi
यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा अाराेप करत काँग्रेसच्या अामदारांनी विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हाती ‘भाेपळा’ व ‘काेरी पाटी’ घेऊन फडणवीस सरकारविराेधात निदर्शने केली.

मुंबई- कोकणात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर अाहे. तसेच मुंबईत राहणारा कोकणी माणूसही नेहमीच शिवसेनेच्या बाजूनेच उभा राहताे. त्यामुळे शिवसेनेच्या या मतपेढीकडे अाता भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे शुक्रवारच्या राज्य अर्थसंकल्पातून दिसून अाले. या अर्थसंकल्पात कोकणाला मोठ्या प्रमाणावर झुकते माप देत शिवसेना आणि मंत्रिमंडळातील प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या नारायण राणे यांना एकाच वेळी खुश करण्याचा भाजपने प्रयत्न केला अाहे. तसेच कोकणी मतदारांनाही आपल्या बाजूला ओढण्याचाही  प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे शिवसेना- भाजपमध्ये दिलजमाईची ही सुरुवात असल्याचीही युतीच्या नेत्यांमध्ये चर्चा हाेती.


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोकणावर मेहेरनजर केल्याचे दिसून आले. तीर्थक्षेत्र गणपती पुळेच्या विकासासाठी २० कोटींची तरतूद, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० कोटी रुपयांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्याची योजना, सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ल्यात निवती रॉक येथे भारतातील पहिली बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी उपलब्ध करून समुद्रपर्यटनाची सुरुवात, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १० कोटींची तरतूद, कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी व उद्योजकांसाठी १०० कोटींची तरतूद, खार बंधाऱ्याच्या कामासाठी ६० कोटींची तरतूद, प्रवासी जलवाहतुकीसाठी २२ कोटींची तरतूद, कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी २४ कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.


सरकारच्या ‘काेकणप्रेमा’बाबत भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले, मतदारांना आकृष्ट करण्यासाठीच याेजना असतात. तसे केल्यास जनता त्या पक्षाच्या पाठीमागे उभी राहते. कोकणात गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद कमी झालेली आहे.  मात्र केवळ अर्थसंकल्पात तरतूद केल्याने मतदार वळत नाहीत तर त्यांच्यासाठी कामही करावे लागते. राणे यांना खुश करण्यासाठीही काेकणावर जास्त लक्ष दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे. भाजपचे नेते मात्र त्याचे खंडन करतात.

 

शिवसेनेमुळेच तरतुदी; अनिल परब यांचा दावा
शिवसेना प्रवक्ते अनिल परब म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष अाजवर नेहमीच कोकणवासीयांच्या बाजूने असते. शिवसेनेच्या दबावामुळे नव्हे तर आग्रहामुळे अर्थसंकल्पात झुकते माप दिले आहे. योजना जाहीर करून मते मिळत नसतात. त्यासाठी जनतेची रोज कामे करावी लागतात. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करीत आहे.’

 

काेकणच नव्हे राज्याचा विकास : मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणे आमचे ध्येय आहे. कोकणातील योजना प्रलंबित होत्या त्या आम्ही मार्गी लावल्या आहेत. यात काहीही राजकारण नाही वा कोणाचा दबावही नाही. जनतेच्या हिताच्या ज्या ज्या योजना आहेत त्या आम्ही मार्गी लावणार आहोत.’

 

 

उद्धव ठाकरेंच्या पाठपुराव्यामुळेच तरतुदी : केसरकर

अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘फक्त कोकणच नाही तर संपूर्ण राज्याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष असते. या योजनांमुळे कोकणवासीय नक्कीच आनंदी होतील. मुख्यमंत्री आमचे ऐकतात व सूचना मान्यही करतात. उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीत एक लाखांची मर्यादा वाढवून दीड लाख केली. राज्याच्या विकासाचा प्रयत्न शिवसेना- भाजप करीत आहे.’ दरम्यान, उद्या नारायण राणे तरतुदींचे श्रेय घेतील? या प्रश्नावर केसरकर म्हणाले, ‘ सिंधुदुर्ग किल्ला बांधला तेव्हा महाराजांना तरी कुठे ठाऊक हाेते. याचे श्रेय काेणी घेईल ते.’

 

क्षणचित्रे

- दुपारी दोन वाजता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री साेबतच विधानसभेत अाले.  
-  मुनगंटीवार हे चौथ्या रांगेतील बाकावर बसलेले भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे गेले व त्यांच्याशी हस्तांदोलन करून आपल्या पहिल्या रांगेतील आसनाकडे गेले.    
- ‘आमच्या सरकारने आज १ हजार २३० दिवस म्हणजे २९ हजार ३७६ तास पूर्ण केले आहेत, अशी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणाची आगळीवेगळी सुरुवात केली. 
- मुनगंटीवार जेव्हा अर्थसंकल्पाचे वाचन करत हाेते, तेव्हा पंकजा मुंडे, राम शिंदे, दिलीप कांबळे आदी मंत्री आपल्या खात्याला किती व कोणत्या योजनांसाठी निधी मिळाला आहे, त्याची टिपणे काढण्यात गर्क होते. 
- अर्थसंकल्पाची सुरुवात करताना मुनगंटीवार यांनी ‘शेतकरी आमुचा कणा, कितीही कठीण परिस्थिती येवो, हित त्याचे पाहू’, या काव्यपंक्ती सादर केल्या. त्या सर्वांनी दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...