आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने जवळीक वाढवल्याने शिवसेनेकडून ‘माेदीविराेध’ साैम्य; गैरहजर राहून अप्रत्यक्ष मदतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नेहमीच उघडपणे माेदींविराेधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारविराेधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी मात्र विराेधकांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. माेदींविराेधात कितीही ‘डरकाळ्या’ फाेडल्या तरी सत्तेत असताना त्यांच्याविराेधात जाऊन उपयोग नसल्याचे ठाकरेंना पटले अाहे. मात्र तरीही माेदींना जाहीरपणे पाठिंबा देऊन त्यांच्या पारड्यात मते टाकल्यास जनतेच्या मनातून उतरण्याची भीती वाटू लागल्यानेच शिवसेनेने या अविश्वास ठरावाच्या वेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी या कृतीतून माेदी सरकारला अप्रत्यक्ष समर्थनच दिल्याचा अर्थ काढला जाताे. अर्थात, काही दिवसांत भाजपने शिवसेनेबाबत घेतलेली नरमाईची भूमिका, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे ‘मातोश्री’वर जाणे तसेच अविश्वास प्रस्तावापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी फाेन करून केलेली चर्चा या घडामाेडींचीही शिवसेनेच्या ‘बहिष्कार’ निर्णयाला पार्श्वभूमी अाहे.  


वायएसआर काँग्रेसच्या ५ खासदारांनी राजीनामे दिल्याने अाता लाेकसभेत खासदारांची संख्या ५३५ वर अाली अाहे. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या परीक्षेत बहुमत सिद्ध करण्यासाठी माेदी सरकारला २६८ जागांची आवश्यकता हाेती. एकट्या भाजपचे संख्याबळ २७४ असून एनडीएच्या घटक पक्षांसोबत त्यांची संख्या ३१५ होते, तर विरोधी पक्षांची एकत्रित संख्या २२० आहे. त्यामुळे शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले असते तरी  मोदी सरकारला काहीही धोका उद्भवला नसता. शिवसेनेचे लाेकसभेत १८ खासदार आहेत, तर बीजेडीचे २० खासदार आहेत. दुसरीकडे नितीशकुमार यांनी व्हीप जारी करून नरेंद्र मोदींच्या सोबत राहण्याचे निश्चित केले हाेते. शिवसेना प्रतोद चंद्रकांत खैरे यांनीही माेदींना पाठिंबा देण्याबाबतचा व्हीप काढला होता, परंतु पुन्हा ‘वरिष्ठांच्या अादेशानुसार’ त्यांना घूमजाव करत मतदानाचा व्हीप काढला नसल्याचे स्पष्ट करावे लागले अन् शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यातून अापण नरेंद्र मोदींच्या साेबत नसल्याचे दाखवण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात त्यांची छुपी भूमिका लपून राहिलेली नाही.  


गेल्या काही महिन्यांपासून भाजपने शिवसेनेबाबत घेतलेल्या मैत्रीच्या पवित्र्यामुळेच शिवसेनेचा सूर बदलल्याचे सांगितले जाते. केंद्र आणि राज्यात भाजपसाेबत सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसे. भाजपही तोडीस तोड उत्तर देऊन शिवसेनेला डिवचत असे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारी रोजी मेळाव्यात पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचे घोषित केले. त्यानंतर भाजपमध्ये खळबळ माजली आणि युती आवश्यक असल्याचे भाजपचे जबाबदार नेते बोलू लागले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती आवश्यक आहे, असे मुख्यमंत्रीही सांगू लागले. 


दरम्यान, ‘शत-प्रतिशत’चा नारा देणारा भाजप  युतीची भाषा का बाेलू लागला, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला. भाजप- शिवसेना एकत्र आले तर? या प्रश्नाने विरोधकांची झोप उडाली आहे. ‘आमची मैत्री जुनी आहे, परंतु काही कारणास्तव युती तुटली. राजकारणात गोष्ट कायम राहत नाही. राज्यात वातावरण वेगळे असून युतीशिवाय पर्याय नाही ही बाब शिवसेनेचे नेतेही खासगीत मान्य करतात. एकत्र आलो तरच आम्हीच सत्तेवर राहू शकतो. त्यामुळे शिवसेनेशी युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही युतीची भाषा करीत आहोत,’ असे भाजपच्या एका वरिष्ठ आणि ‘मातोश्री’च्या जवळ असलेल्या नेत्याचे म्हणणे आहे.  


उद्धव ठाकरेंची नाराजी का?  
- २०१४ मध्ये माेदी मंत्रिमंडळात शिवसेनेला एकच मंत्रिपद देण्यात अाले. त्याचे खातेवाटप करतानाही विश्वासात घेण्यात अाले नाही.   
- खरे तर पूर्वीच्या युती व एनडीए सरकारमध्ये शिवसेनेला अाधी खाते सांगितले जायचे अाणि त्यांनाच मंत्रिपदासाठी नावे ठरवण्याचे अधिकार दिले जायचे. या वेळी मात्र राज्यात व केंद्रात फक्त मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या काेट्यातून अाधी नावे मागवण्यात अाली अाणि नंतर खाते ठरवण्यात अाले, हे ठाकरेंना खटकले.  
- पूर्वी शिवसेनेत असलेल्या सुरेश प्रभू यांना  भाजपत अाणून मंत्रिपद दिले. तेव्हापासून उद्धव ठाकरे खूप नाराज झाले. पाठाेपाठ २००४ मध्ये  भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी युती ताेडली. ‘युतीची सत्ता आली, परंतु आमचे संबंध सुधारले नाहीत. परंतु आता आम्हाला आमची चूक कळून आली आहे’ असे भाजप नेते खासगीत मान्य करतात. एवढेच नव्हे तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका युतीने लढल्यास यशाचे गणितही समजावून सांगतात.  
- शिवसेनेला दुय्यम वागणूक देण्याची चूक भाजपकडून घडल्याचा पश्चात्ताप अाता भाजपच्या केंद्रीय नेत्यांनाही वाटू लागला अाहे. त्यामुळेच अमित शहा दाेन वेळा ‘माताेश्री’वर जाऊन अाले. एवढेच नव्हे तर कितीही कठाेर वागली तरी शिवसेनेशी नरमाईचे धोरण स्वीकारण्याचे अादेश राज्यातील भाजप नेत्यांना बजावण्यात अाले अाहेत. टीकेला प्रत्युत्तर न देण्याचे साैजन्यही पाळले जात अाहे. याचा चांगला परिणाम म्हणजे युतीतील बिघडलेले संबंध संथ गतीने का हाेईना सुधारत असल्याचे संकेत मिळत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...