आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंडाईचा प्रकल्पाच्या जमीन व्यवहाराची होणार चौकशी; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येमुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या राज्य सरकारने धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने झालेल्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. ६) विधानसभेत ही घोषणा केली. नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांच्या आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.   

 

बावनकुळे म्हणाले, चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती यांच्या नावाची घोषणा केली जाईल. तसेच येत्या तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, राज्याच्या मंत्रालयाच्या इतिहासातील ही कदाचित सर्वाधिक दुर्दैवी घटना असावी. आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूलमंत्री व धुळ्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. मात्र, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.   


धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते. पण ते जिवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र काही तासांतच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणूनबुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ३०२ चा गुन्हा का दाखल होऊ नये? असा प्रश्न राधाकृष्ण विखे- पाटील यांनी या वेळी बोलताना उपस्थित केला.  


एका गुंठ्यासाठी १ कोटी कसे : चव्हाण
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण फक्त त्यांना योग्य मोबदला देण्यापुरते मर्यादित नाही. या आत्महत्येतून इतरही अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची ४ एकर जमीन संपादित करताना त्यांना केवळ ४ लाख रुपये देण्यात आले. पण बाजूलाच एका मंत्र्याचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह गिरासे यांची शेती होती. त्यांना मात्र ७८ गुंठ्यांसाठी तब्बल १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला कसा मिळाला? अशी विचारणा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.  

 

धर्मा पाटलांनी स्वीकारला हाेता मोबदला : बावनकुळे  
जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर मोबदला दिल्यानंतही संबंधित शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देता येते, अशी माहिती या वेळी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी दिली. भूसंपादनात ज्यांनी दलाली केली आहे, ती पुढे आली पाहिजे, असे राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणाले.   प्रकल्पातील १९९ शेतकऱ्यांपैकी धर्मा पाटील व नरेंद्र पाटील यांनी या दोघांनीच जमीन संपादनाचा मोबदला स्वीकारला होता. त्यानंतर ते आंब्याच्या झाडाच्या भरपाईसाठी आग्रही हाेते.  मात्र, त्यांच्या शेतात आंब्याची झाडे नव्हे, तर रोपे होती. शेजारच्या गिरोसे यांच्या शेतात डाळिंबाची रोपे होती. त्यामुळे त्यांना कोटीत मोबदला मिळाला, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

बातम्या आणखी आहेत...