आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक करून पोट भरा, तारखा विकून कसली पोटं भरता?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाकवी कालिदास नाट्यसंकुल (मुलुंड)
मराठी माणूस नाटकवेडा आहे व म्हणूनच रंगकर्मींची जबाबदारी मोठी आहे. नाट्यक्षेत्रात काही चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत. त्या नष्ट करायला हव्यात. रंगकर्मी पोट भरण्यासाठी नाटक करायचे, आता तारखा विकून पोट भरण्याचा प्रकार सुरू झाला आहे..हे प्रकार बंद झाले पाहिजेत, त्यासाठी प्रामाणिक रंगकर्मींनी एकत्र यावे. मराठी नाटकांत संहिता व भव्यता हातात हात घालून चालू लागल्या, तर पुन्हा वैभवाचे युग सुरू होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.


आज मोबाइलवर जगातले नाटक दिसत आहे. त्यातील भव्यता, विषयांचे नावीन्य, थेटपणा नव्या प्रेक्षकांना भावत आहे. त्याच अपेक्षा त्यांनी मराठी नाटकाकडून केल्या तर त्यात गैर काय? प्रसंगी तिकिटांचे दर वाढवा, रंगकर्मींनी मिळून नाटक मोठे करा. उत्तम, भव्य संहिता आणा, विषय घ्या आणि भले किंमत वाढवा, प्रेक्षक येतो की नाही, पाहा..अशा ठाम शब्दांत राज यांनी रंगकर्मींच्या सौम्यपणावर कोरडे ओढले.


अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९८ व्या नाट्यसंमेलनाचे उद््घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. पारंपरिक नांदीगायन, नटराजपूजन, श्रीफल, तिसरी घंटा वाजवून संमेलनाचा पडदा उघडला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष जयंत सावरकर, नवनिर्वाचित अध्यक्ष कीर्ती शिलेदार, नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि स्वागताध्यक्ष विनोद तावडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


संगीत नाटक ही देणगी असेल तर त्याचा अनुल्लेख का : कीर्ती शिलेदार
कीर्ती शिलेदार म्हणाल्या, ‘नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा विठ्ठलाच्या महापूजेचा मान आहे, अशी माझी भावना आहे. आईवडिलांनी बालवयापासून संगीत नाटकाचा वसा दिला, तो आजवर प्राणपणाने जपला. संगीत नाटक ही अवघड कला आहे. त्यासाठी वेगळे प्रशिक्षण गरजेचे असते. असे वेगळे मार्गदर्शन प्रदान करणारे गुरू आम्हाला लाभले. संगीत रंगभूमी ही महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे म्हटले जाते, मग संगीत नाटकाचा अनुल्लेख का, ते डावलले का जाते, असा प्रश्न मला पडतो’, अशा शब्दांत ९८ व्या नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकाविषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.


संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे वैभव आहे. तो महान वारसा आहे. दिग्गज कलावंतांनी तो जोपासला व समृद्ध केला आहे. ते संस्कार आम्हालाही मिळाले आणि त्यांचा व्रत म्हणून आम्ही स्वीकार केला. पण आज संगीत नाटकाचा अनुल्लेख खटकतो, असे त्या म्हणाल्या. संगीत नाटक हा आमचा प्राण आहे. आजही संगीत नाटकासाठी काहीही करायची आमची तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

मराठी नाटकांत आशय दिसत नाही : शरद पवार
राज यांचा मुद्दा अधोरेखित करत शरद पवार यांनीही आशय व विषय मराठी नाटकात दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, सादरीकरणात अभिव्यक्तीचा विचार महत्त्वाचा आहे. बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्याची गरज असून  बालरंगभूमी ही प्रायोगिक रंगभूमीचा व प्रायोगिक रंगभूमी हा व्यावसायिक रंगभूमीचा पाया असल्याचे म्हणाले. रंगकर्मींनी नव्या कल्पनांचा, विषयांचा ध्यास घ्यावा. नाट्यगृहांचा दर्जाही चांगला असावा, सुविधांसाठी प्रेक्षक सहज पैसे खर्च करतील. 

 

तावडेंची फटकेबाजी
संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत जोरदार फटकेबाजी केली. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनते, पण नेते अभिनय, दिग्दर्शनात रंगकर्मींप्रमाणेच वाकबगार असल्याचे तावडेंनी उदाहरणासह स्पष्ट केल्याने रसिकांमध्ये हशा उसळला. सतत तणावाखाली असूनही हसरा चेहरा जपणारे उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे हे उत्तम अभिनेते. राज ठाकरे उत्तम नकलाकार आहेत, तर शरद पवार कसलेले दिग्दर्शक आहेत, असे तावडे यांनी सांगताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

बातम्या आणखी आहेत...