आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी परीक्षेचे राज्यात 200 डमी परीक्षार्थी; विरोधकांनी विधानसभेत मांडली कैफियत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत डमी उमेदवार बसवून राज्य सेवेत प्रशासकीय अधिकारी होत आहेत. असे २०० डमी परीक्षार्थी आहेत. याप्रश्नी राज्य सरकारने डमी परीक्षार्थींच्या रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी गुरुवारी विरोधी बाकावरील सदस्यांनी विधानसभेत केली. तसेच सभागृहातील दिवसाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून याप्रश्नी चर्चा करावी (स्थगन प्रस्ताव) अशी मागणी केली. मात्र, विरोधकांचा प्रस्ताव अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग केला.  


स्थगन मांडताना राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, गोरगरीब घरातील दरवर्षी दहा लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात. या परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवले जात आहेत. त्या डमी उमेदवाराच्या माध्यमातून पास होऊन शासकीय सेवेत दाखल होतात. हे २०१५-१६ पासून घडत आहे. ही बाब योगेश जाधव (नांदेड) नावाच्या तरुणाने उघडकीस आणली. योगेश जाधव या विद्यार्थ्याने याबाबत अडीच हजार मेल पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयास  पाठवले आहेत. याप्रकरणी जून २०१६ गुन्हा दाखल झाला. आजही महाराष्ट्रात २०० डमी बसणारे उमेदवार मोकळे फिरत आहेत.   

 

जे लोक डमी उमेदवार बसवून पास होऊन सरकारी सेवेत आहेत अशांची संख्या जवळपास हजार दीड हजारांच्या घरात आहे. २०० एजंट असे डमी बसण्याचे काम करत आहेत. सरकार एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक करत नाही. या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात. बायोमॅट्रिक पद्धतीने व्हाव्यात, अशा मागण्या राज्यातले तरुण करत आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.  


सरकारने निवेदन करावे
२५०० निवडी डमी उमेदवारांना परीक्षेला बसवून झाल्या आहेत. इतका मोठा घोटाळा आहे. कर्ज घेऊन पुण्यात मुले अभ्यास करतात. सरकारने या बाबतीत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन करावे. सरकारची भूमिका भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केला.   

 

आता तरी कारवाई करा : अजित पवार  
सरकारने या प्रकरणी योग्य कारवाई केली नाही तर विद्यार्थी संताप बाहेर येईल. डमी उमेदवार घेऊन अधिकारी बनलेल्या पदावरून हटवा. २०१५ पासून आम्ही तक्रार करत आहोत. आता तरी कारवाई करा. अन्यथा विद्यार्थांचा परीक्षा पद्धतीवरचा विश्वास उडेल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.  यावर अध्यक्ष बागडे म्हणाले, दुपारनंतर २९३ हा शिक्षणावरचा प्रस्ताव आहे. त्यात हा मुद्दा मांडा, असे  म्हणत स्थगन प्रस्तावाच्या चर्चेची मागणी त्यांनी फेटाळली. त्यानंतर संतापलेल्या विरोधी पक्षाच्या वेलमध्ये उतरून सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...