आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या नियुक्तीवरून खडसे, सावंतांची खडाजंगी; सावंत म्‍हणाले, तर रूग्‍णालये बंद करतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एक महिन्याच्या आत जळगावमध्ये डाॅक्टर उपलब्ध होण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिले. मात्र, जळगावमध्ये डाॅक्टर का टिकत नाही या कारणांचाही शोध घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

अर्थसंकल्पातील आरोग्य विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर
देत असताना त्यांनी हे आश्वासन दिले. मात्र, या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री आणि एकनाथ
खडसे यांच्यादरम्यान चांगलाच वाद झाला.    


भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी चर्चेदरम्यान जळगाव जिल्ह्यात शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा मुद्दा मांडला. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून आपण जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा प्रश्न आव्हान म्हणून स्वीकारला आहे.

 

यासाठी प्रतीक्षा यादीतील डाॅक्टर्सच्या आम्ही मुलाखती घेतल्या. एकूण १२० डाॅक्टर्सपैकी फक्त
सात डॉक्टरांनी जळगावमध्ये जाण्याची तयारी दाखवली आहे. लवकरच ते या जिल्ह्यात रुजू होतील, असे ते म्हणाले. सावंत यांच्या उत्तराला आक्षेप घेत खडसे यांनी सध्या एकही डॉक्टर नसल्याचा मुद्दा पुन्हा जोरकसपणे मांडला. तसेच डॉक्टर्स येत नसतील तर शासकीय रुग्णालये बंद करा, असा उद्विग्न सल्लाही दिला.   

 

रुग्णालये बंद करतो : डॉ. सावंत  
‘हा प्रश्न काही आपण मंत्री झाल्यानंतर निर्माण झाला नसून तो पूर्वीही अस्तित्वात होता. आपण त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, तरीही आपण सांगत असाल तर दवाखाने बंद करून टाकतो, असे डॉ. सावंत यांनी प्रत्युत्तर दिल्याने काही काळ सभागृहातील वातावरण तप्त झाले. अखेर प्रतिनियुक्ती किंवा इतर काही उपाययोजना करून आपण जळगाव जिल्ह्यात आवश्यक तेवढे डॉक्टर्स उपलब्ध करून द्या, असे निर्देश देत अध्यक्षांनी या वादावर पडदा टाकला.

 

बातम्या आणखी आहेत...