आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​तथ्यहीन आरोप करणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? खडसेंची सरकारवर आगपाखड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘अद्याप माझ्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र, हा नाथाभाऊ कसा नालायक आहे, हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर आगपाखड केली. तसेच माझ्यावर तथ्यहीन आरोप करणाऱ्यांवर सरकार काही कारवाई करणार आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीदरम्यानच खडसेंनी हे आरोप केले.   


आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या वैयक्तिक बदनामीबाबतचा प्रश्न मंगळवारी उपस्थित केला. आपली बदनामी करणारी एक ध्वनिफीत सध्या समाज माध्यमांवरून जाणीवपूर्वक पसरवली जात अाहे. असे तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याचे ठाकूर म्हणाले. आपल्याकडे लोकप्रतिनिधींच्या आठशे ध्वनिफिती असल्याचा दावा प्रमोद गवळी नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता करत असून जर अशा व्यक्तींकडे लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असतील, तर सरकारने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली. हाच मुद्दा अधोरेखित करत खडसे यांनी सरकारवर तोफ डागण्याची संधी साधली.   


‘आपल्यावर बेछूट आरोप झाले. आपण जर दोषी ठरलो तर फाशी द्या. मात्र, आरोपात काहीच तथ्य नसल्याचे चौकशीअंती दिसल्यानंतर खोटे आरोप  करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे, तेव्हा त्यांच्यावर काय कारवाई केली गेली, हेसुद्धा सरकारने सांगावे,’ अशा शब्दांत खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नाहक आरोप करून एखाद्याला बदनाम  करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे धोरण सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.   

 

नियमांची तपासणी करून  कारवाई : मुख्यमंत्री  
ठाकूर व खडसेंच्या अाक्षेपांवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले. तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकते, याबाबत कायद्यात काही तरतूद आहे का, हे तपासले जाईल तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक ​बोलावून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...