आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ या मुख्यमंत्र्यांच्या खास योजनेचे जोरदार वाभाडे काढले. फडणवीस सरकार मुस्लिम समुदायाबाबत भेदभाव करत असल्याचा आरोपही केला.
खडसे म्हणाले, जलयुक्त शिवारची कामे पहिल्या वर्षी जितकी होती, त्याची तुलना करता सध्या फक्त २५ टक्के कामे चालू आहेत. शिवार योजनेला सध्या पैसादेखील दिला जात नाही. त्यामुळे ही योजना सध्या थंड बस्त्यात आहे. या योजनेतील अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे, त्याबाबत मराठवाड्यात काहींवर गुन्हेही दाखल झाले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून किती गावे दुष्काळमुक्त झाली, या योजनेवर आजपर्यंत किती पैसा खर्च झाला, या योजनेतून किती पाणी साठवण क्षमता वाढली, किती हेक्टर क्षेत्र यामुळे सिंचनाखाली आले आहे, राज्याच्या दुष्काळी भागातील पाणीपातळी किती वाढली, याची सर्व माहिती मंत्र्यांनी सभागृहाला दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुळात जलयुक्त शिवार योजना तशी चांगली आहे. मात्र, सध्या या योजनेसाठी अटीच अधिक टाकल्या आहेत. ही योजना अटींमध्ये अडकवली जात आहे. तांत्रिक गोष्टी पुढे करून या योजनेत अडथळे आणले जात आहेत, असा आरोपही खडसे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर केला.
मुख्यमंत्र्यांवरील नाराजी उघड
जलयुक्त शिवार योजना मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प ग्रामविकास विभाग राबवत आहे. मात्र, खडसे यांनी जलयुक्त शिवार योजनेवर आरोप करून एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे. खडसे यांच्या या भाषणातून त्यांची मुख्यमंत्र्यासंदर्भातील नाराजी स्पष्ट झाली आहे.
अल्पसंख्याक विभागास सापत्न वागणूक
अल्पसंख्याक विकास विभागाला पैसा दिला जात नाही. यंदा केवळ ४०० कोटी अर्थसंकल्पात दिले आहेत. मी या विभागाचा काही काळ मंत्री होतो. अनेक चांगल्या योजना मी करण्याचा प्रयत्न केला. प्रस्तावही पाठवले. मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. पण उपयोग झाला नाही. कामे करायची नसतील तर हा विभाग ठेवला कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी आपल्या भाषणात केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.