आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक आर्थिक मंचाच्या केंद्राचा मुंबईत विस्तार : मुख्यमंत्री फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आर्थिक मंचाने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सांगितले. दावोस येथील जागतिक आर्थिक मंच-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जागतिक आर्थिक मंचाचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्हॅल्युचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर या वेळी व्यापक चर्चा झाली.  


जागतिक आर्थिक मंचाच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या मंचाच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.   


क्लिन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीतून व्हॅल्युचेनला अधिक चालना देऊन राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीक पद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही चर्चा अन्न सुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांकडून शाहरुखचे अभिनंदन  
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. गावांना डिजिटली कनेक्ट करण्याची व्यापक योजना आणि इंडस्ट्री ४.० अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांनी या वेळी चर्चा केली. तसेच ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या मदत व पुनर्वसनासाठी मीर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यांना जागतिक आर्थिक मंचाचा क्रिस्टल अवॉर्ड मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे या वेळी अभिनंदन केले.

 

बातम्या आणखी आहेत...