आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​एप्रिलच्या अखेरीस राज्यात मंत्रिमंडळ विस्तार? मेहतांना डच्चू, शेलारांना संधी मिळण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्षभरापासून रखडलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मेहतांना डच्चू, शेलारांना संधी?

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात येऊ शकते. त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. चार नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता आहे. परंतु, हे नवे चेहरे कोणते असतील याविषयी सरकारने आद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

 

अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा....

भाजपच्या स्थापनादिनी झालेल्या महामेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही एक ते दीड तास बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचे समजते. 

शिवसेनेला ऑफर...?
दरम्यान मुंबईत झालेल्या महामेळाव्यात भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेची पाठराखण करत गोंजारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला देखील भाजपकडून ऑफर देण्यात येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...