आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनाचा पहिला आठवडा बळीराजाचा; मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहिमेला उघडे पाडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फसवी कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळणे, हमीभाव न मिळणे तसेच गारपिटीची नुकसान भरपाई आदी मुद्द्यांवर सोमवारपासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात फडणवीस सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष विधिमंडळ सदस्यांच्या समन्वय समितीत मंगळवारी घेण्यात अाला.  


राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ समन्वय समितीची मंगळवारी विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, प्रतोद आमदार संजय दत्त, आमदार नसीम खान, आमदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्यांवर अधिवेशनात हल्ला चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून सातत्याने होणारे इव्हेंट यासह अनेक विषय अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. पाच आठवडे अधिवेशन आहे. प्रत्येक आठवड्यात विरोधी पक्षाला एक प्रस्ताव मांडण्याची संधी असते. त्याचे पाचही विषय आज निश्चित करण्यात आले.  


२५ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सकाळी ११ वाजता सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होत आहे. त्यामध्ये राज्यातील फडणवीस सरकारविरोधातील रणनीतीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.  


दोन मुद्दे कळीचे...  
अधिवेशनात पहिल्या आठवड्यात शेतकरी समस्यांवर सभात्याग, तहकुबी नवी बाब नाही. मात्र मागच्या तीन वर्षांत शिक्षकांच्या जागा न भरणे, गुंतवणुकीचा बागुलबुवा उभा करणे, तरीसुद्धा रोजगाराच्या संधीची उणीव असणे आदी मुद्द्यांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हात घालायचा असे काँग्रेसने ठरवले आहे. शिक्षण व बेरोजगारी या दोन मुद्द्यांद्वारे भाजप सरकारच्या मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र या खास मोहिमांची हवा काढून घेण्याची संधी काँग्रेस या अधिवेशनात साधणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...