आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमीला मदत करणाऱ्याचीच उलटतपासणी; काेर्टाच्या अादेशाचाही पाेलिसांना विसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

मुंबई- जखमी अवस्थेत पडलेल्या एका रेल्वे प्रवाशाला तरुणाने माणुसकीच्या भावनेतून रुग्णालयात दाखल केले. मात्र रेल्वे पाेलिसांकडून या तरुणाला अरेरावी सहन करावी लागली. ‘जखमी प्रवाशाला कोणाच्या परवानगीने रुग्णालयात दाखल केले, त्या जखमी प्रवाशाला हात का लावला, मदत करण्यापूर्वी पोलिसांना का कळवले नाही, पोलिस येईपर्यंत वाट का पाहिली नाही,’ अशा प्रश्नांची अक्षरश: सरबत्तीच रेल्वे पोलिसांनी त्या मदत करणाऱ्या तरुणावर केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांच्या अरेरावीचा एक नमुना नुकताच समोर आला आहे.   


मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळांवर एक प्रवासी जखमी अवस्थेत पडला होता. या तरुणाची मदतीसाठीची याचना ऐकून श्रवण तिवारी नावाचा एक तरुण मदतीसाठी सरसावला. तिवारी यांनी इतर प्रवाशांचा मदतीने जखमी प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्याने त्या प्रवाशाचा जीव वाचला. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तिवारी यांचे कौतुक करण्याऐवजी रेल्वे पोलिसांनी उलट त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून रात्री दोन वाजेपर्यंत उलटतपासणी घेतली. खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना, किंवा जखमी व्यक्तीची माहिती पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या इच्छेशिवाय कोणतेही प्रश्न विचारू नयेत किंवा त्यांना कोणत्याही शासकीय प्रक्रियेत समाविष्ट करून घेऊ नये. मात्र असे असतानाही तिवारींना पोलिसांनी नाहक रात्री दोन वाजेपर्यंत चौकशीसाठी बसवून ठेवले. शेवटी तिवारी व त्यांच्यासाेबतच्या काही व्यक्तींनी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली आणि चौकशीचे मोबाइल रेकॉर्डिंग सुरू केले तेव्हा पोलिसांनी नरमाईचा सूर लावत तिवारी यांच्यासह मदत करणाऱ्या इतर प्रवाशांना सोडून दिले. हा सर्व प्रकार आणि चित्रफिती तिवारी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या. त्यावर माध्यमांनी त्याबाबत पश्चिम रेल्वे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची रीतसर चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली. 

 

मदतीअभावी हजाराे प्रवाशांचे बळी

२०१७ मध्ये फक्त पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या ३०१४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३३४५ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच २०१८ मध्ये अवघ्या दीड महिन्यात ३५५ प्रवासी पश्चिम रेल्वेवर प्रवासादरम्यान अपघातात मृत्युमुखी पडले आणि ३६२ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी बहुतांश प्रवाशांना वेळेवर रुग्णालयात दाखल न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मात्र रेल्वे पोलिस जर अशा पद्धतीने प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्यांना वागणूक देत असतील तर मदतीसाठी कोण पुढे येईल, असा सवाल केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...