आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घोटाळ्यानंतर इंदिरा गांधींनी बनविले मुख्यमंत्री पण वर्षभरात सोडावी लागली होती खुर्ची!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचा जन्म 15 जानेवारी 1921 रोजी झाला होता. बाबासाहेब भोसले यांनी जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 1983 या 13 महिन्याच्या काळात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. सिमेंट घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी अनपेक्षितपणे रोखठोक व दिलखुलास बाबासाहेबांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर त्यांना केवळ 13 महिन्यातच मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी होते बाबासाहेब, इंग्रजांनी तुरूंगातही डांबले...

 

- बाबासाहेब भोसले हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला.
- 1939 साली झालेल्या सत्याग्रहादरम्यान बाबासाहेब विद्यार्थी दशेत होते. मात्र त्यांनी सहभाग घेतला त्यामुळे त्यांना 1941-1942 मध्ये दीड वर्षाचा तुरूंगवास झाला होता.
-  बाबासाहेब हे कायद्याचे पदवीधर होते. त्यामुळे त्यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर साता-यात दहा वर्षे वकिली केली.
- वकिली करत असतानाच तो राजकारणात ओढले गेले.
1980 साली आमदार झाले. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली.
- त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या मंत्री राहिल्या. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. 
- माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले होते.

 

मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा घेतला निर्णय-

 

- बाबासाहेब भोसले यांनी आपल्या कालखंडात राज्यातील मुलींना शिक्षण घेता यावे व महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे यासाठी दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
- त्यांच्या कालखंडात औरंगाबाद येथील खंडपीठाची निर्मिती करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती त्यांच्याच कार्यकाळात झाली.
- बाबासाहेब भोसले हे स्वत: स्वातंत्रसेनानी असल्याने त्यांनी स्वातंत्रसैनिकांसाठी पेन्शन सुरू केली.
- बाबासाहेब मुख्यमंत्री असतानाच राज्यातील पोलिसांनी संप केला होता. मात्र, पोलिसांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याचे सांगत पोलिसांचे युनियन मोडून काढले होते. 

 

केवळ इंदिरा यांच्यामुळे बनले मुख्यमंत्री-

 

- बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले ते केवळ आणि केवळ इंदिरा गांधी यांच्यामुळेच.
- सिमेंट घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे नाव समोर येताच त्यांना खुर्ची सोडावी लागली.
- त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला बनवावे असा प्रश्न इंदिरा यांच्यापुढे होते.
- त्या काळात मराठा नेत्यांचा काँग्रेसमध्ये दबदबा होता. त्यामुळे स्टाँग मराठा लॉबीमुळेच अंतुलेंचे प्रकरण बाहेर आणल्याचे बोलले गेले. ही माहिती इंदिरा यांच्यापर्यंत गेली.
- त्यामुळे इंदिरा यांनी नवा मुख्यमंत्री निवडताना प्रस्थापित नेत्यांना डावलून बाबासाहेबांची निवड केली.
- ही निवड एवढी अनपेक्षित होती की एक वेळ खुद्द बाबासाहेबांनाच यावर विश्वास बसत नव्हता. पण त्याकाळी सर्व इंदिरा याच होत्या. त्यांच्या निर्णयापुढे प्रस्थापित नेत्यांचा ब्र काढण्याची सुद्धा हिंमत नव्हती.
- वसंतदादा पाटील यांना संधी मिळेल असे बोलले गेले पण 1978 साली शरद पवारांनी त्यांचे सरकार पाडून 'पुलोद' सरकार स्थापन केले होते. शरद पवारांचे सरकार वसंतदादांच्या गाफील व कचखाऊ भूमिकेमुळे बनल्याचे इंदिरांचे म्हणणे होते व त्यामुळे त्या वसंतदादावर नाराज होत्या. 
- या घडामोडीनंतर 1980 साली लोकसभेत व राज्यात इंदिरांच्या काँग्रेसने मोठा विजय मिळविल्यानंतर त्यांनी वसंतदादांऐवजी अंतुले यांना मुख्यमंत्री केले.
- मात्र, पुढे अंतुलेंचे सिमेंट प्रकरण व मराठा समाजातील नाराजीमुळे इंदिरांनी सावध खेळी करत मराठा समाजाला मुख्यमंत्रीपद दिले पण प्रस्थापित नेत्यांना डावलून लो- प्रोफाईल व बॅरिस्टर अशा बाबासाहेबांची निवड केली.
- मात्र, वर्षभरात इंदिराजींना आपला निर्णय बदलावा लागला व बाबासाहेबांना 13 महिन्यात खुर्ची सोडावी लागली. बाबासाहेबांनंतर वसंतदादा पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले.  

 

रोखठोक व दिलखुलास बाबासाहेब-

 

- बाबासाहेब भोसले यांच्याबाबत एक सांगितले जायचे ते म्हणजे जे मनात तेच त्यांच्या ओठात. 
- 'वरुन लादलेले' मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांबद्दल काँग्रेस आमदारांमध्ये खूप नाराजी होती. हे कॉंग्रेसचे नाराज आमदार भोसले यांच्याविरोधात बंड करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. 
- स्वाभाविकपणे पत्रकारांनी या संदर्भात बाबासाहेबांना प्रश्न केला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची असते."
- पक्षश्रेष्ठी इंदिरा गांधी यांच्यामुळे बाबासाहेब ध्यानीमनी नसताना अचानक मुख्यमंत्री झाले. हे औटघटकेचे पद आले तसे गेलेही. पण त्याचे जराही दुःख त्यांना नव्हते. 
- मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, "माझं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं. पण माझ्या नावामागं ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?" 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, यासंबंधित आणखी माहिती....

बातम्या आणखी आहेत...