आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे माजी नगरसेवक सावंत यांची मुंबईत हत्या; दोघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे कांदिवली परिसरातील माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री उशिरा त्यांच्या राहत्या घरापासून २०० मीटर अंतरावर चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून हत्या केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेले वाहनही जप्त केले आहे. अशोक सावंत हे मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त सुभाष सावंत यांचे भाऊ आहेत.   


कांदिवली परिसरातील समतानगर भागातून अशोक सावंत (६२) हे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवकपदाच्या निवडणुकीत निवडून आले होते. रविवारी रात्री एका मित्राला भेटून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सावंत यांनी केबल व्यवसायात प्रवेश केला होता. गेल्या २ दिवसांपासून त्यांना खंडणीसाठी धमक्याही येत होत्या. त्यामुळे या हत्येमागे धमक्या देणाऱ्यांचा किंवा केबल व्यवसायातील कुणाचा हात आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस दोन हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दोन संशयितांना अटकही केली असून त्यांच्याकडून चौकशी करून अधिक माहिती घेतली जात आहे.

 

मारेकरी सीसीटीव्हीत कैद 

सावंत यांचे मारेकरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असे या आरोपीचे नाव असून,  त्यालाच पोलिसांनी अटक केली असल्याचे समोर येत आहे. तर इतर चार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. 

 

खंडणीसाठी हत्या?

सावंत यांना गेल्या काही दिवसापासून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. त्याबाबत सावंत यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. या खंडणी प्रकरणातूनच त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...