आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: कसा होता हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस, पाहा फोटोमधून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेत गरूवारी कामकाजाचा चौथा दिवसही गोंधळाने अर्धा वाया गेला. मागचे तीन दिवस विरोधकांनी कामकाज बंद पाडले होते. गुरूवारी थोडेफार कामकाज चालले. यावेळीही मात्र सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री यांच्यात खडाजंगी झाली. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी सरकार व मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही निशाणा साधला. 34 हजार कोटींची शेतक-यांना कर्जमाफी दिल्याच्या जाहिरातींची अजित पवारांनी चिरफाड केली.

 

भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. विरोधी पक्षात आपण सातत्याने मागण्या करायचो, मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा निशाणा खडसेंनी सरकारवर साधला. राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक काम करतात, त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी आज विधानससभेत सरकारला विचारला. त्यावर रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यावर आपण निर्णय घेऊ शकत नाही. 

 

मुंडे यांच्या उत्तराला हरकत घेत, “मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवते, असे खडसे म्हणाले. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाची माहिती घेऊन,ती सभागृहाला दिली जाईल असे आश्वासन दिले. यापूर्वीच्या सरकारने रोजगार हमी योजनेवरील कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता म्हणून, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होतो. पूर्वी विरोधात होतो. त्यामुळे सातत्याने प्रश्न विचारायचो आता सत्तेत आलोय तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आपली जबाबदारी आहे, अशी आठवण खडसे यांनी राज्य सरकारला करून दिली.

 

मिहानमधील पतंजली फूड पार्कसाठी स्वस्त दरात जागा का देण्यात आली, असा प्रश्न संजय दत्त यांनी लक्षवेधीतून उपस्थित केला. त्यावरील चर्चेच्या उत्तरात राज्यमंत्री मदन येरावार यांनी जागा नियमानुसार देण्यात आल्याचे सांगितले.राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने संजय दत्त यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावरून सभागृह नेते चंद्रकांत पाटील व संजय दत्त यांच्यात खडाजंगी उडाली.

 

एका लक्षवेधीला किती वेळ द्यायचा? असे चंद्रकांत पाटील म्हणाले. उत्तराने समाधान झाले नसेल तर तुम्ही बाहेर जाऊन प्रश्न मांडा, त्यासाठी वेगवेगळी माध्यमे आहे. आंदोलने करा वा न्यायालयात जाऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबतही शाब्दिक चकमक उडाली. त्यावर मुंडे यांनी, एकतर पतंजली माझा नाही, मी बाबा नाही व मला योगासने येत नाही, असा हल्लाबोल केला. अॅप्रोच रोडला किती खर्च झाला, हे सांगायला तयार नाही. दीड वर्षात तीनदा लक्षवेधी आली आहे. एक तर उत्तर नीट द्या नाही तर राखून ठेवा, असे मुंडे यांनी सुनावले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चौथ्या दिवशी कसा होता हिवाळी अधिवेशनाचा रंगारंग...

बातम्या आणखी आहेत...