आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास पाटील यांच्या सीआयडी चौकशीसाठी सरकार तयार, गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या अखेरच्या कालावधीत मान्यता दिलेल्या ३३ प्रकरणांची राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यास सरकार तयार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत केली. याबाबतच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.   


शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या दोन्ही आमदारांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना वायकर म्हणाले की, विश्वास पाटील यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी मंजूर केलेल्या एकूण १३७ पैकी ३३ प्रकरणांमध्ये गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सचिवांद्वारे त्याची अधिक चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा अहवाल महिनाभरात सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या अहवालाच्या अनुषंगाने दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

 

यावर ज्या विभागात भ्रष्टाचार झाला, त्याच विभागाच्या सचिवांकडून चौकशी कशी केली जाऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यावर विधानसभा सदस्यांची मागणी असेल तर या प्रकरणांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यास सरकार तयार आहे, असे राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हणाले.  

 

बातम्या आणखी आहेत...