आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RESULT: मुंबई \'शिक्षक\'मध्ये कपिल पाटील व \'पदवीधर\'मध्ये शिवसेनेचे पोतनीस विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल पाटील 4500 मतांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. - Divya Marathi
कपिल पाटील 4500 मतांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.

मुंबई- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमाेजणी गुरूवारी झाली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे उमेदवार कपिल पाटील विजयी झाले. त्यांनी हा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा राखला. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपच्या अमित मेहता यांच्यावर विजय मिळवत मुंबईची जागा कायम राखली आहे. या मतदारसंघातून पूर्वी अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत हे शिवसेनेचे अामदार हाेते, मात्र यावेळी डाॅ. सावंत यांचा पत्ता कापून शिवसेनेने पाेतनीस यांना उमेदवारी दिली हाेती. पोतनीस यांना १९३५४ तर भाजपच्या अमित मेहता यांना ७७९२ मते मिळाली. 

 

कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे. डावखरे यांना शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी तगडे अव्हान दिले. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे यांचा पराभव केला.

 

सोमवारी 25 जून रोजी मुंबई व कोकण पदवीधर आणि कोकण व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात 53 टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात 83 टक्के, कोकण पदवीधर मतदारसंघात 73 टक्के तर नाशिक शिक्षक मतदारसंघात 92 टक्के इतके मतदान झाले होते.

 

मुंबई पदवीधर मतदारसंघ-

 

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अॅड. अमित मेहता, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष दीपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात होते.

 

कोकण पदवीधर मतदारसंघ-

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली. 

 

मुंबई शिक्षक मतदारसंघ-

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण 10 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले.

 

नाशिक शिक्षक मतदारसंघ-

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात होते.

बातम्या आणखी आहेत...