आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पाण्यातच..7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशभरात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला आहे. सध्या देशात मान्सूनला सक्रिय ठेवणाऱ्या ६ प्रणाली कार्यरत आहेत. या आठवड्यात मध्य व दक्षिण भारतात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईला सलग तीन दिवस अतिवृष्टीने झोडपले असतानाच आणखी ७ दिवस मुसळधार पाऊस शहराला झोडपण्याची शक्यता असून मराठवाडा-विदर्भासह राज्यात चांगल्या पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (अायएमडी) दिला आहे. 


आयएमडीनुसार, देशात सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. सध्या मान्सूनचा अक्ष फिरोजपूर, अलवर, उमरिया , संबलपूर , पुरी ते पूर्व-मध्य बंगालचा उपसागर असा आहे. याशिवाय देशात सध्या पावसाला अनुकूल अशा मान्सूनच्या ६ प्रणाली कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या सर्व प्रणाली ११ ते १४ जुलैपर्यंत कार्यरत राहतील, त्यामुळे देशभर हा आठवडा पावसाचा राहण्याची शक्यता आहे. 


मुंबईमध्ये पाऊस वाढणार 
दक्षिण गुजरात ते उत्तर कोकण असा चक्रीवादळसदृश स्थितीचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची तीव्रता अधिक आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात ठिकठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला राहील. 


मुंबईत जुलैच्या पहिल्या १० दिवसांत मासिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस 
मुंबईत एक जुलै ते १० जुलै या काळात एकूण ७५४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात ६ वेळा अतिवृष्टी झाली. मुंबईत २ जुलै रोजी १३१ मिमी ३ जुलै -११८ मिमी ७ जुलै- १३१ मिमी ८ जुलै - १२२ मिमी ९ जुलै - १८४ मिमी १० जुलै रोजी १८० मिमी अशी अतिवृष्टी झाली. मुंबईची जुलै महिन्याची सरासरी ८४० मिमी आहे. 
स्रोत : आयएमडी, स्कायमेट 


उत्तर केरळ आणि लगतच्या भागात चक्रीय स्थिती 
बंगालच्या उपसागरातील उत्तर भाग व लगतच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. ते १३ जुलैपासून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रासह आेडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वाढणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...