आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारला सूचना; गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष पोलिस पथक नेमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हत्या तसेच महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रकरणांचा त्वरित चौकशी करून निपटारा करण्याच्या उद्देशाने विशेष पोलिस पथक तयार करावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही पीडिता सध्या २६ आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्या गर्भपातासाठी परवानगी देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी याचिकेद्वारा मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. न्यायालयाने यास परवानगी दिलेली आहे.

 

परंतु, पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी काही उपाययोजना केल्यात याची स्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन. एच. पाटील आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही सूचना केली. दरम्यान, महाधिवक्ता अभिनंदन वाग्यानी यांनी सरकारची बाजू मांडत सांगितले की, या प्रकरणी मागच्या वर्षी जुलै महिन्यात अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये आरोपींना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर फक्त अपहरणाचाच गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर बलात्काराच्या कलमाही लावण्यात आल्या. त्यावर न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. जुलै महिन्यात तक्रार दाखल होऊनही गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी या प्रकरणी काहीच चौकशी केली नाही. याचा अर्थ पोलिस अशी प्रकरणे गांभीर्याने घेत नाहीत. जर कायदा आणि न्यायव्यवस्था या बाबींना गांभीर्याने घेत आहे तर पोलिसांना काय होते, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लवकरच उच्च न्यायालयात होणार आहे.

 

पोलिसांची दोन गटांत वर्गवारी करण्याची वेळ आली आहे  

न्यायालयाने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवले. आता पोलिस विभागाची दोन गटांत वर्गवारी करण्याची वेळ आली आहे. त्यापैकी एक युनिट हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी, तर दुसरे फक्त महिलाविषयक गुन्हे तसेच हत्या, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठीच काम करणारे असावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने गांभीर्याने विचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...