आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा; अमेरिकेत कर्ज 0.25 % महागले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/न्यूयॉर्क -  जागतिक अर्थव्यवस्था २००७-०८ च्या मंदीच्या परिणामांतून जवळपास बाहेर निघाली आहे. जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकांच्या निर्णयामुळे ही बाब स्पष्ट होत आहे. अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढच केली नाही, तर २०१८ मध्ये आणखी दोन वेळा व्याजदरात वाढ करण्याचे संकेेेेतही दिले आहेत. 


गुरुवारी चीनच्या पीपुल्स बँक ऑफ चायना आणि युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी)ची बैठक झाली. या दोन्ही बँकांनी व्याजदरात वाढ केली नसली तरी ईसीबीने जानेवारीपासून बाँड खरेदीच्या रूपात दिलासा देणारे पॅकेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने फेब्रुवारीमध्ये तर चीनने मार्च महिन्यात व्याजदरात वाढ केली होती. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानच्या केंद्रीय बँकेची बैठक शुक्रवारी होणार आहे.  


बाजाराला २०१८ मध्ये फेडरलच्या वतीने तीन वेळ व्याजदरात वाढ करण्याची अपेक्षा होती. मात्र, फेडने चार वेळा दरवाढीचे संकेत दिले आहेत. याचा परिणाम भारतासह सर्व आशियाई बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स १३९.३४ अंक म्हणजेच ०.३९ टक्क्यांच्या घसरणीसह ३५,५९९.८२, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ४८.६५ अंकांच्या घसरणीसह १०,८०८.०५ या पातळीवर बंद झाला. 


फुटबॉल वर्ल्ड कपचा परिणाम : शेअर ट्रेडिंगमध्ये ५५% घटीची शक्यता : या स्पर्धा रशियामध्ये होत आहेत. टाइम झोनचा विचार केल्यास युरोप, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या तासातच या वेळी जास्त स्पर्धा होणार आहेत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेतील अंतिम स्पर्धेच्या दिवशी शेअर बाजारातील ट्रेडिंग व्हॉल्युम दोनतृतीयांश राहिले होते. या स्पर्धेमध्ये ज्या-ज्या दिवशी ज्या-ज्या देशांची स्पर्धा असते त्या-त्या दिवशी त्या-त्या देशातील शेअर बाजारातील ट्रेडिंग ५५ टक्के कमी होते.

 

५०,००० कोटी रुपये काढले 

- अमेरिकेत व्याजदरात वाढ होत असल्याने विदेशी गुंतवणूकदार विकसनशील देशांमधून पैसे काढून तेथे गुंतवणूक करत आहेत. एफपीआयने एप्रिलपासून आतापर्यंत भारताच्या शेअर बाजारातून १५,६९५ कोटी व डेटमधून ३३,७४५ कोटी म्हणजेच एकूण ४९,४४० कोटी रुपये काढले आहेत. 


- आयडीबीआय कॅपिटल मार्केटचे संशोधन विभागप्रमुख ए. के. प्रभाकर यांनी सांगितले की, ईसीबीच्या या निर्णयामुळे नकारात्मक धारणा तयार होईल. भारतीय बाजारावर याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 

 

फेडरलची ०.२५% दरवाढ  
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याज दरात ०.२५ % वाढ केली. तसेच यावर्षी दरात २ वेळा वाढ करणार असल्याचे संकेतही दिले. अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत असून व्याजदरात वाढीमुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे मत या बैठकीत सर्वांनीच मान्य केले. याचा अर्थव्यवस्थेतील वाढीवरही कोणताच परिणाम होणार नसल्याचे फेडरलने म्हटले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था मजबुतीसह वाढत असल्याचे फेडचे प्रमुख जेरोम एच पॉवेल यांनी म्हटले आहे. अमेरिकेमध्ये बेरोजगाराचे प्रमाण कमी झाले असून लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेत २०१८ मध्ये दोन टक्के महागाई दर राहण्याचा अंदाज आहे, तर २.८ टक्के विकास दराचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...