आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांतील घोळ सुरूच आहे. बदल्यांसाठी घालण्यात अालेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी पुन्हा केली अाहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने २९ एप्रिल रोजी राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा इशारा दिला अाहे.
शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात मंत्रालय पातळीवर जोरदार हालचाली चालू आहेत. मात्र, शिक्षक संघटनांनी काही अटी बदलण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाविरोधात या संघटनांनी दंड थोपटले आहेत. ‘अाम्ही परळी ते भगवानगड असा २ लाख शिक्षकांचा मोर्चा काढणार होतो. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शिक्षकांच्या मागण्यांची तीव्रता दाखवून द्यायची होती. मात्र, विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकांची १३ जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली झाल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २९ एप्रिल रोजी हे मूकमोर्चे काढले जातील. ३५ जिल्ह्यांतील शिक्षक या मूकमोर्चात सहभागी होतील’, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात (पुणे) यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ग्रामविकास विभाग बदल्यांबाबत मनमानी करत आहे. त्यामुळे मूकमोर्चानंतर बदल्यांसंदर्भातील नियमावलीत बदल केला नाही तर राज्यव्यापी जेलभरो केले जाईल, असा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.
काय आहेत मागण्या?
एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकास खो देण्याची पद्धत रद्द करावी. पती-पत्नीमधील कामाच्या ठिकाणाचे अंतर ३० कि.मी. पेक्षा अधिक असू नये. बदल्यांची टक्केवारी १० टक्केपेक्षा अधिक असता कामा नये, अशा २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात याव्यात, अशा मागण्या शिक्षक संघटनांच्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.