आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी प्रकरणात सट्टेबाज सोनूसह 5 जणांवर मोक्का; सट्टेबाजाराचे धागेदोरे थेट दाऊदपर्यंत?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असतानाही सेलिब्रिटी का खेळतात सट्टा? - Divya Marathi
पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असतानाही सेलिब्रिटी का खेळतात सट्टा?

मुंबई - आयपीएल बेटिंगप्रकरणी अटकेतील सट्टेबाज सोनू जालान, त्याच्या ४ साथीदारांसह गँगस्टर रवी पुजारी याला मोक्का लावण्यात आला आहे. ठाण्यातील रितेश शहा या मसाले व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपी जालान, मुनीर खान, सुरेंद्र बागरी ऊर्फ ज्युनियर कोलकाता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा यांनी रवी पुजारीचे नाव सांगत २२ जानेवारीला शहा यांना जबरदस्तीने ठाणे येथून गोरेगावला नेले. शहा यांच्या मालकीच्या एका फ्लॅटच्या तारणपत्रावर बंदुकीचा धाक दाखवून सह्या करण्यास सांगितले.

 

तसेच ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. प्रकरणी जालानसह ४ बुकी व रवी पुजारी अशा ६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. खंडणीखोरीचे हे प्रकरण जरी सट्टेबाजीशी संबंधित नसले तरीही या प्रकरणाद्वारे सोनू जालान आणि इतर बुकींचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आले असून या मुद्द्याचा उपयोग पोलिसांना खटल्यादरम्यान होणार आहे. 
बुकींचे दाऊदशी संबंध बुकी साेनू जालानच्या आतापर्यंत चौकशीतून या सट्टेबाजीत अडकलेल्या अनेक बड्या लोकांची नावे समोर आली आहेत. सिनेअभिनेता अरबाज खान, निर्माता पराग संघवी, एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ समीर बुधा अशा काहींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

 

अरबाज खानने आपण सोनूकडे सट्टा खेळण्याची कबुली दिली असून यात आपण दोन कोटी ८० लाखांची रक्कम गमावल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. निर्माता पराग संघवी हा आपला या धंद्यातील भागीदार असल्याचा दावा सोनूने केला आहे. समीर बुधा हादेखील आपला साथीदार असल्याचा दावा सोनूने केला असून त्याच्याच नावे असलेल्या कारमधून सोनूला अटक करण्यात आली होती. निर्माता पराग संघवीने सोनू जालानशी असलेले सगळे संबंध नाकारले आहेत. आपण निर्माता असल्याचे कळल्याने सोनूने संबंध वाढवले होते, पण सोनू बुकी असल्याचे समजताच त्याच्याशी संबंध तोडल्याचे परागने चौकशीदरम्यान सांगितले. 

 

दहावी नापास सोनूला बनायचे होते किंग   

सोनू जालान हा देशातील एक मोठा बुकी आहे. या धंद्यामार्फत अवघ्या सोळा वर्षांत सोनू जालानने हजारो कोटी रुपयांची माया जमवली आहे. दहावी नापास असलेला सोनू जालान अगोदर मुंबई आणि राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा खबरी होता. या ओळखीच्या बळावर तो सिनेसृष्टीतील बडे तारे-तारका, क्रिकेटपटू आणि उद्योगपतींच्या वर्तुळात पोहोचला. छानछोकीची आवड असलेल्या सोनूने मुंबईत ३ आलिशान फ्लॅट भाड्याने घेतले असून यापैकी एका फ्लॅटचे भाडे जवळपास दीड लाखाच्या आसपास असल्याचे समजते. तसेच महागड्या मोटारींचा ताफाही तो बाळगून आहे.

 

बेटिंगमधून मिळालेला पैसा त्याने बेनामी संपत्तीत गुंतवला आहे. ठाणे पोलिसांना सोनूच्या घरातून मिळालेल्या डायरीतील नोंदीनुसार यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने जवळपास ५०० कोटींची उलाढाल केली आहे. अंतिम सामन्यावरील सट्ट्यात तर त्याने दहा कोटींचा निव्वळ नफा कमावल्याची माहिती आहे. आपले एक ऑटो पार्ट््सचे दुकान असल्याचे तो लोकांना भासवायचा.

 

 ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने १६ मे रोजी डोंबिवलीतील एका इमारतीत छापा मारून आयपीएल सामन्यांच्या सट्ट्याचे रॅकेट उद‌्ध्वस्त केले. या छाप्यादरम्यान देशातील एक माेठा बुकी सोनू जालान पोलिसांच्या हाती लागला. सोनू जालानच्या चौकशीतून एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे होत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अरबाज खान किंवा साजिद खानसारखे स्टार, काही माजी पोलिस अधिकारी आणि अनेक बडे व्यावसायिक या प्रकरणात गुंतल्याचे समोर आले आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचत असल्याचीही माहिती अाहे. या चौकशीतून आणखीही अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असून हे प्रकरण कसे वळण याचा अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र हे प्रकरण नेमके काय आहे याचा ‘दिव्य मराठी’ने सर्वांगाने घेतलेला हा वेध…

 

मानसाेपचारतज्ञांच्या मते, ‘प्रत्येक मनात जुगाराची सुप्त इच्छा’

अभिनेता अरबाज खानसारखे सेलिब्रिटी पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असतानाही सट्टेबाजीकडे का वळतात, अधिक पैशाची त्यांना हाव का असते, याबाबत मुंबईतील एक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवींद्र अभ्यंकर यांचे मत जाणून घेतले. त्यांच्या मते, ‘कोणताही मनुष्य मग तो सुशिक्षित असो, अशिक्षित असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाच्या मनात जुगार खेळण्याबाबत एक सुप्त इच्छा असते. किमान एकदा आपण नशीब आजमावून पाहिले पाहिजे असे वाटणे ही एक सहज मानवी प्रवृत्ती आहे. ते एक प्रकारचे थ्रील आहे. मी नक्कीच जिंकेन असा एक सुप्त आत्मविश्वास प्रत्येकाला असतो. अगदी महाभारतातही जुगाराचे दाखले सापडतात. पण म्हणून प्रत्येक माणूस जुगार खेळत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे एक कारण असते. पण माणसाची हाव सुटत नाही. सिनेसृष्टीतील व्यक्तींना तर पैसा, प्रसिद्धी, वलय, चाहत्यांचे प्रेम अशा सर्व बाबी मिळालेल्या असतात तरीही त्यांना जुगार खेळावासा वाटण्यामागे हीच हाव असते. जे आपल्याकडे आहे ते पुरेसे आहे, असे कधीच कोणी म्हणत नाही. प्रत्येकाला अजून काहीतरी हवे असतेच. त्यातून मग असे प्रकार घडतात, असे डॉ. अभ्यंकर म्हणाले.   

 

मॅच फिक्सिंगचे बदलते तंत्र... अाता स्पाॅट फिक्सिंगवरच भर   

पूर्वीच्या व मॅच फिक्सिंगच्या तंत्रात बराच बदल झाला आहे. पूर्वी संपूर्ण सामना फिक्स करून निकाल बदलला जायचा. अाता स्पॉट फिक्सिंग हा नवा प्रकार समोर आला आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये याच पद्धतीने फिक्सिंग झाली.  त्यात एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलावर बीसीसीआयने कारवाई केली होती. स्पॉट फिक्सिंग म्हणजे सामन्याचा विशिष्ट भागच फिक्स करायचा. म्हणजे एखाद्या विशिष्ट षटकात सट्टेबाजांना सामील गोलंदाजाने अतिरिक्त धावा द्यायच्या. नेमक्या कोणत्या षटकात तो या धावा देणार आहे ते षटक सुरू करण्यापूर्वी गोलंदाजाने संकेत बुकींना द्यायचा. म्हणजे टॉवेल कंबरेला खोचणे किंवा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी बराच वेळ घेणे अशा विशिष्ट हालचालीतून खेळाडू संकेत देत असे. हे संकेत जाणून घेत बुकी सट्ट्याच्या दरात चढ-उतार करत मोठा नफा कमावतो. या प्रकारात संपूर्ण संघ फिक्स करण्याऐवजी एक किंवा दोन खेळाडूंना फिक्स केले जातात. 

 

हायटेक तंत्रज्ञान, एकाच वेळी पन्नास बुकींशी संपर्क   
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता सट्टेबाजीही अधिक व्यापक झाल्याचे दिसते. पोलिसांनी सोनू जालानच्या घरावर घातलेल्या धाडीदरम्यान एक विशेष यंत्र जप्त केले, ज्या यंत्राच्या माध्यमातून सोनू जालान दर षटकानंतर एकाच वेळी देशभरातील ५० बुकींच्या संपर्कात असे. एका मोठ्या चार्जरला २१ मोबाइल फोन आणि हेडफोन्स, आवाज कमीअधिक करण्यासाठीच्या बटणांसह स्पीकर्सची सोय या यंत्रात आहे.  या संभाषणादरम्यान वापरण्यासाठी विशिष्ट शब्दांना प्रतिशब्द म्हणून सांकेतिक शब्दांची नोंद असलेली एक डायरीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. पूर्वी एखाद्या टेलिफोनच्या साहाय्याने केली जाणारी निरोपांची देवाणघेवाण आता तंत्रज्ञानामुळे बहुस्तरीय झाली आहे.   

 

सोनू दाऊदच्या साथीदारांच्या संपर्कात 
मुंबईतील मालाड येथे वास्तव्यास असलेल्या या सोनू जालानचे थेट संबंध दाऊदशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनू हा रईस सिद्दिकी आणि अनिल टुंडा या दाऊदच्या दोन विश्वासू साथीदारांच्या नियमित संपर्कात असून हे दोघे भारत, पाकिस्तान, दुबई आणि आखाती देशातील सट्टेबाजारावर नियंत्रण ठेवून असतात. या दोघांची सोनूने दुबईत बऱ्याचदा भेट घेतल्याची बाब समोर आली आहे. या सर्व सट्टेबाजारातील उलाढालीचा पैसा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि छोटा शकीलमार्फत जमा केला जातो.    

 

 पुढील स्लाईडवर पहा... संबंधित छायाचित्र... 

 

 

बातम्या आणखी आहेत...