आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकच हीच आपली संपत्ती; महाराष्ट्र आता 'पुस्तकांचं राज्य' व्हावं: सुभाष देसाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलार (महाबळेश्वर)- पुस्तकांचे गाव ही संकल्पनाच अत्यंत वेगळी आहे. बघता बघता या गावाला वर्ष झालं. काही दिवसांनी अशा शाखा राज्यातील अनेक गावांमध्ये व्हाव्यात आणि हळूहळू आपलं राज्यच 'पुस्तकांचं राज्य' व्हावं अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. पुस्तकच आपली संपत्ती आहेत त्यामुळे आपण समृद्ध होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.


देशातील पहिले आणि एकमेव पुस्तकांचे गाव अर्थात भिलार येथे वर्षपूर्तीनिमित्ताने खुले रंगमंच आणि 5 नवीन कुटुंबीयांकडे दालनाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शुक्रवारी (दि. 4) बोलत होते. 


सुभाष देसाई म्हणाले की, भिलारसारख्या पुस्तकांच्या गावाच्या राज्यभर शाखा व्हाव्यात, कारण पुस्तकच आपली संपत्ती आहे. राज्य आर्थिक दृष्ट्या कसे आहे काय आहे या विचारात ना पडता आपण पुस्तकांमुळे समृद्ध झालो तर इतर अनेक प्रश्नही सुटतील आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जर अशी उपलब्धी होणार असेल तर निसर्ग, साहित्य आणि संस्कृतीचा मिलाफ होईल आणि अशी गावच अनुभव संपन्न करणारी, समृद्ध करणारी ठरतील अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अशा प्रकल्पांसाठी उद्योग खात्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही नक्कीच देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. 


विनोद तावडे म्हणाले की, अशा प्रकल्पांसाठी मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांकडे झोळी पसरावी लागते. तीच मागणी आम्ही उद्योग खात्याकडे केली आणि देसाईनी लगेच त्याला मंजुरी देत त्यांच्या माध्यमातून आज हा कुला रंगमंच तयार झाला आहे. जसे वेडिंग डेस्टिनेशन्स असतात तसे पुस्तक प्रकाशनाचे डेस्टिनेशन्स का नसावे या विचाराने हा रंगमंच बांधण्यात आला आहे. प्रकाशकाने, लेखकाने या ठिकाणी यावे आणि पुस्तकाचे प्रकाशन करावे हा त्यामागील हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.

 

या गावात हा प्रकल्प यशस्वी झाला हे संपूर्ण श्रेय गावकऱ्यांचे आहे. गावात आधी 25 कुटुंबीयांकडे दालन होते आता 5 दालन वाढली आहेत. एखादा अनोळखी माणूस येतो, घरात 4-5 तास पुस्तक वाचायला बसतो, त्याचे आदरातिथ्य करायचे हे सोपे नाही. ते हे गावकरी करत आहेत. या प्रकल्पामुळे वाचन संस्कृती वाढते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून गावातील रस्ता रुंदीकरण आणि इतर सुविधांबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे, असेही तावडेंनी स्पष्ट केले. 

 

यावेळी सांस्कृतिक तथा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केक कापून यावेळी पुस्तकांच्या गावाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील काही कुटुंबियांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील लोकप्रतिनिधींसह, गावकरी, साहित्यिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या कार्यक्रमाचे लाईव्ह फोटोज....

बातम्या आणखी आहेत...