आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- अर्भक मृत्यू (० ते १ वर्ष) पाठोपाठ अाता महाराष्ट्रातील बालमृत्यूंचा (१ ते ५ वर्ष) दरही २४ वरून २१ वर आला अाहे. मागील वर्षापेक्षा तीन अंकांनी घट झाल्याची नोंद केंद्र शासनाच्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम’ (एसआरएस) २०१६ च्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार केरळ, तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमूद केले आहे. मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचा अर्भक मृत्यू दर २१ वरून १९ एवढा कमी झाल्याची नोंद अाहे.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया दरवर्षी एसआरएस अहवाल जाहीर करत असतो. त्यामध्ये माता व अर्भक मृत्यूची देशभरातील राज्यांची आकडेवारी जाहीर केली जाते. आता २०१६ च्या अहवालात सर्वात कमी बालमृत्यू केरळ (११), तामिळनाडू (१९) व त्यानंतर महाराष्ट्राचा (२१) क्रमांक लागताे. संपूर्ण देशाचा बालमृत्यू दर हा ३९ एवढा असून त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा चार अंकांनी घट झाली आहे. सर्वाधिक बालमृत्यू मध्य प्रदेश (५५), ओडिशा (५०), आसाम (५२), छत्तीसगड (४९), उत्तरप्रदेश (४७), राजस्थान (४५), कर्नाटक (२९), गुजरात (३३), दिल्ली (२२) अशी अहवालात नोंद आहे.
महाराष्ट्रातील बालमृत्यू
> २०१३ - २६
> २०१४ - २३
> २०१५ - २४
> २०१६ - २१
सरकारने केलेल्या या उपायांचा झाला लाभ
संस्थात्मक बाळंतपणासाठी विशेष भर, अर्भकांचे लसीकरण, अर्भकांसाठी गृहभेटीद्वारे तपासणी व उपचार सेवा, जव्हार, मोखाडा, तलासरी, मेळघाट येथे पुनरागमन शिबिराच्या माध्यमातून स्थलांतरित झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने शिबिर यांसारख्या उपाययोजना केल्यामुळे अर्भक व बालमृत्यू दर घटता ठेवण्यात यंत्रणेला यश येत आहे. राज्यात वर्षभरात २० लाख बालकांचे लसीकरण पूर्ण झाले. आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करत आहे त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.