आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • आदेश बांदेकरांना सिद्धीविनायक पावला..सरकारकडून मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा Aadesh Bandekar Got Minister State Statute In Maharashtra

आदेश बांदेकरांना राज्यमंत्र्यांचा दर्जा, आता मिळणार विविध 14 प्रकारच्या सुविधांचा लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  अभिनेते तथा शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. बांदेकर हे मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहेत. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या विधी व न्याय विभागाने घेतला आहे. त्यामुळे बांदेकरांना सरकारच्या १४ सुविधा मिळतील. काही दिवसांपूर्वी भाजपने वैधानिक विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली हाेती, त्यावेळी डावलल्याने शिवसेना नाराज हाेती. ती दूर करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली असल्याची चर्चा अाहे.

 

‘होम मिनिस्टर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले ‘भावजी’  ऊर्फ आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. बांदेकर हे मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे त्यांना १४ सुविधा मिळणार आहेत.   

 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बांदेकरांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण यात त्यांचा पराभव झाला. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. भाजप व शिवसेनेचे संबंध कायमच ताणले गेले आहेत. या संबंधांत सुधार व्हावा व २०१९ साठी युती व्हावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेला मिळालेला हा सुखद धक्का आहे.  बांदेकर काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. अभिनय क्षेत्रातून सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतही त्यांना वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.  

 

आदेश बांदेकरांना या सुविधा मिळणार  
दरमहा ७,५०० मानधन, स्वीय सहायक, शिपाई, लेखनिक सुविधा, मोटारीच्या इंधनासाठी वार्षिक ७२ हजार, दूरध्वनीसाठी मासिक ३ हजार, निवासस्थान, शासकीय विश्रामगृहाची सोय, बैठक भत्ता, सार्वजनिक कार्यक्रमात राज्यमंत्र्यांनंतरचे स्थान आदी १४ सुविधांचा लाभ राज्यमंत्री या नात्याने बांदेकरांना मिळतील. मात्र, त्यांना मोटारीवर राष्ट्रध्वज व लाल दिवा लावता येणार नाही.  

 

मध्य प्रदेशचा ‘आध्यात्मिक’ कित्ता   
मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने ५ संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. त्यात भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा व पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाकारला होता. सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन मध्य प्रदेशचाच कित्ता फडणवीस सरकारने गिरवला आहे.

 

११ सदस्यीय सिद्धिविनायक मंदिर न्यास  

सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी हा ११ सदस्यांचा ट्रस्ट अाहे. ३० आॅगस्ट २०१७ रोजी आदेश बांदेकर या ट्रस्टचे अध्यक्ष झाले. राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून ट्रस्टवरील व्यवस्थापन सदस्यांची नियुक्ती केली जाते. हा ट्रस्ट शिवसेनेच्या वाट्यास गेला. त्यामुळे बांदेकर यांना अध्यक्षपद मिळाले. ट्रस्टवरील नेमणुका तीन वर्षांसाठी आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...