आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या वृद्धेने मंत्रालयात प्राशन केले खोकल्याचे औषध;जमीनीच्या वादातून घडली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नव्या वर्षात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारी सखुबाई कारभारी झाल्टे (६५) या वृद्ध महिलेने खोकल्याचे औषध प्राशन करून खळबळ उडवून दिली. सदर वृद्ध महिला नाशिक  जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आहे. घटनेनंतर त्यांना सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रानी सांगितले.


सखुबाई यांचे सासरे भिका लक्ष्मण झाल्टे यांची ३ हेक्टर ५७ आर इतकी जमीन आहे. १९४७ पासून झाल्टे कुटुंबीयांचा चुलत घराण्याशी जमिनीच्या हिस्से वाटणीचा वाद आहे. ७/१२ वर दोन्ही गटांची नावे आहेत. दुसरा गट हा सुनील वाल्मीकी झाल्टे आदी आठ लोकांचा आहे. दरम्यान, हा वाद सरकारकडे गेला होता. प्रांत अधिकारी यांनी या महिलेच्या बाजूने निकाल दिला होता. जमिनीचा ताबा देण्यासाठी महिलेला पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या गटाने अपील केल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिली होती. परंतु जमिनीचा ताबा मिळावा, अशी या महिलेची मागणी आहे. आपल्याला जमिनीचा ताबा मिळावा यासाठी सदर महिला शुक्रवारी  महसूल विभागात आली होती. मंत्रालयातून बाहेर पडताच तिने सोबत आणलेल्या बाटलीतील खोकल्याचे औषध प्राशन केले. प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी महिलेला तातडीने टॅक्सीत घालून सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. तिच्यासोबत तिचा  मुलगाही होता. या महिलेचा  दुसरा मुलगा पुण्यात कृषी सहायक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. 

 

एका महिन्यात 5 घटना, दोघांचा मृत्यू
मंत्रालयात गेल्या महिन्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पाच घटना घडल्या आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला. 22 जानेवारीला जमिनीच्या मोबादल्यासाठी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने विष घेतले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नंतर 2 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील मारोती धावरे या तरुण शेतकऱ्याने विषाची बाटली घेऊन मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला अडवण्यात आले. 7 फेब्रुवारीला अहमदनगरच्या अविनाश शेटे या युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी हर्षल रावतेने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना ताजी असताना सखुबाई विठ्ठल झाल्टे या वृद्ध महिलेने विष प्राशन करून  आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला आहे. या महिलेवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...